मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:26 AM2018-02-20T04:26:10+5:302018-02-20T04:26:18+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईत लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपाचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईत लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपाचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पर्रीकर उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेला नेले जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सावईकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाशी संबंधित आजारावर उपचार सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहेत. गरज पडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याविषयी ते निर्णय घेतील, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.
ढवळीकर अर्थसंकल्प मांडणार
गोव्याचा २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर मांडणार आहेत. ते फक्त अर्थसंकल्पाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवतील. पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाणार आहे. सोमवारी सुरू झालेले अधिवेशन चार दिवस चालणार आहे.