उत्तरेतून मनोज परब लढणार; रणनीतीबाबत आरजीची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:38 PM2023-12-13T15:38:13+5:302023-12-13T15:38:53+5:30

दक्षिण गोव्याविषयी अजून गुप्तता

manoj parab will contest from north goa rg meeting on strategy | उत्तरेतून मनोज परब लढणार; रणनीतीबाबत आरजीची बैठक 

उत्तरेतून मनोज परब लढणार; रणनीतीबाबत आरजीची बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून आपण लढावे यावर रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाची रणनीती ठरवली जात आहे. उत्तर गोव्यातून आरजीचे प्रमुख मनोज परब हे लढतील, अशी माहिती पक्ष सूत्रांकडून प्राप्त झाली.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून आरजीमध्ये दोन नावे पुढे आली आहेत. मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, असे कळते. ख्रिस्ती धर्मीय उमेदवारास दक्षिणेत तिकीट दिले जाऊ शकते. दरम्यान, कार्यकर्त्यांना नजरेसमोर ठेवून निवडणुकीसाठी एक आराखडा तथा योजना आरजीने तयार केली आहे. रविवारी आरजीची आढावा बैठकही पणजीत पार पडली. लोकसभा निवडणुकीसाठी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांवर सोपविल्या जाणार आहेत.

रविवारच्या बैठकीस मनोज परब, सचिव विश्वेश नाईक, खजिनदार अजय खोलकर आदी उपस्थित होते. परब यांनी सांगितले की, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची टीम तयार केली जाईल. त्यांच्यामार्फत पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत पोहचविली जाईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्यावर देखरेख असेल. आरजीच्या बैठकीत संभाव्य राजकीय परिस्थिती, मतदारसंघातील मुद्दे, अन्य पक्षांची भूमिका यावर चर्चा झाली. सुरुवातीला संघटन तयार करण्यावर भर असावा, असे ठरले. दोन्ही लोकसभा मतदारसंघ लढविण्याबाबत आरजीची तयारी असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आरजीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. दोन्ही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांचा संच करण्यासाठीचा आराखडा पक्षाने तयार केला आहे. यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश अध्यक्ष मनोज परब यांनी कार्यकर्त्यांना दिला. उत्तर गोवा मतदारसंघासाठी संघटन आराखड्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी २० विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथील प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात येईल. त्यांच्यामार्फत पक्षाची भूमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्यावर देखरेख असेल.

सध्या तरी एकला चलो रे...

पक्षाचे प्रमुख मनोज परब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी नावे सुचवावीत, असे सर्वांचेच मत आले त्यानुसार प्रमुख कार्यकर्त्यांना चिठ्ठया देऊन त्यांच्याकडून नावे मागवली. लोकसभा निवडणुकीत सध्या तरी आमची भूमिका 'एकला चलो रे' हीच असून आम्ही आमचे काम आधीच सुरू केले आहे.

दक्षिणेसाठी...

दक्षिण गोव्यात जिल्हाध्यक्ष रुबर्ट परैरा, सचिव शैलेश नाईक व खजिनदार विश्वेश नाईक यांची नावे कार्यकर्त्यांनी सुचवली आहेत. येत्या आठवड्यात पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक होऊन दक्षिण गोव्याचा उमेदवार अधिकृतरित्या निश्चित केले जातील.

 

Web Title: manoj parab will contest from north goa rg meeting on strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा