मुंबईच्या धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल, मनोहर पर्रिकर मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 05:14 PM2017-10-20T17:14:17+5:302017-10-20T17:14:40+5:30
मुंबई पोलिसांकडून ज्या पद्धतीचे मॅन्युअल वापरले जाते, त्याच धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली.
पणजी : मुंबई पोलिसांकडून ज्या पद्धतीचे मॅन्युअल वापरले जाते, त्याच धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली. गोवा पोलिसांचे स्वतःचे असे मॅन्युअल नाही. मुंबई पोलिसांचे मॅन्युअल गोवा पोलीस आतापर्यंत वापरत आले आहेत. मात्र गोवा सरकारने अधिकृतरीत्या कधी ते मॅन्युअल स्वीकारलेले नाही. गोवा पोलिसांचे स्वत:चे मॅन्युअल नसल्यामुळे अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर पर्रीकर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. तसेच निवृत्त पोलीस अधीक्षक ओमप्रकाश कुडतरकर यांची गोव्यासाठी मॅन्युअल तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. येत्या चार महिन्यांत कुडतरकर यांचा विभाग मॅन्युअल तयार करील, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. दरम्यान गोव्यातील दहा पोलिस अधीक्षकांची सेवा व बढती नियमित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.