लोकसभेसाठी 'नवरे' अनेक, पण मुख्यमंत्र्यांचा कल श्रीपाद भाऊंच्याच बाजूने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 01:00 PM2024-02-15T13:00:20+5:302024-02-15T13:01:27+5:30
श्रीपाद नाईक यांनाच तिकीट!
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी / म्हापसा : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाच उत्तर गोव्यातून लोकसभेचे तिकीट दिले जाईल, हे काल अधिकच स्पष्ट झाले. भाजपमध्ये उत्तरच्या तिकिटासाठी अनेक नवऱ्यांनी बाशिंग बांधलेले असले तरी शेवटी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कल हा श्रीपाद भाऊंच्या बाजूने आहे, याची कल्पना बहुतेक मंत्री व आमदारांना काल आली.
उत्तर गोव्यासाठी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन काल, बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा करून श्रीपाद नाईक यांचेच नाव निश्चित झाल्याचे संकेत दिले. लोकांना जो उमेदवार हवा आहे, त्यालाच तिकीट दिले जाईल, तो उमेदवार कोण हे लोकांना ठाऊक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
म्हापशातील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार जेनीफर मोन्सेरात, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई तसेच मगोपचे आमदार जीत आरोलकर व अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार उपस्थित होते. यावेळी सदानंद तानावडे, रोहन खंवटे, श्रीपाद नाईक, निळकंठ हळर्णकर, मायकल लोबो यांची भाषणे झाली. पक्षाचे महासचिव राजसिंग राणे यांनी सूत्रसंचालन, आभार मानले.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी डिचोली साखळीतील सभेवेळी तसेच एकदा श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनी सोहळ्यावेळीही रायबंदरला अशाच अर्थाचे विधान केले होते. श्रीपाद नाईक यांनाच तिकीट द्यावे, अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील केंद्रीय नेत्यांकडेही केली असल्याची माहिती मिळाली.
डबल इंनिजनमुळे विकास प्रकल्प मार्गी
मागील १० वर्षात केंद्राकडून राज्य सरकारला ३० हजार कोटींहून अधिक रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी देण्यात आला. त्यातून अनेक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारमुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस ढासळतेय, आपचा इफेक्ट नाही
इंडिया युती आता राहिलेली नाही. काँग्रेसही ढासळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दक्षिणचे लोक भाजप उमेदवाराच्या पाठिशी राहतील, आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केला असला तरी त्याचा भाजपला काहीच फरक पडणार नाही. मतदार हे भाजपलाच मतदान करणार आहेत, असेही आमदार दिगंबर कामत म्हणाले.
माझे वय कमी असते, तर लोकसभा लढविली असती : दिगंबर कामत
माझे आता वय होत चाललेले आहे. त्यामुळे मी आता देशपातळीवरील राजकारणाचा विचार करत नाही. मी ५० वर्षाचा असतो तर लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार केला असता, असे मत आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. राजभवनवर आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. कामत म्हणाले की, मला आता लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मला मडगावातील प्रत्येक घरातील व्यक्ती ओळखत आहे. त्यामुळे मला मडगाववासीयासाठीच काम करायचे आहे. काँग्रेस सोडताना मला भाजपमध्ये मोठे मंत्रिपद मिळाले असते पण मी त्यासाठी हट्ट केला नाही. आता माझ्या नावाची लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा होत आहे. १९९४ पासून मडगावातून निवडून येत असून यापुढेही मला येथील लोकांसाठी काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.