व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक विदेशी नागरिक गोव्यात; राज्यातील गुन्हे वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:16 PM2019-08-21T21:16:06+5:302019-08-21T21:16:20+5:30
दोन वर्षात २६२ विदेशींविरुध्द विविध प्रकरणात गुन्हे नोंद
पणजी : व्हिसाची मुदत संपली असतानाही गोव्यात बेकायदा वास्तव्य करुन राहणाऱ्या विदेशी नागरिकांचे प्रमाण वाढत चालले आहे. खास करुन नायजेरियन, इस्रायली नागरिक जे बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन राहतात ते ड्रग्स तसेच अन्य व्यवसाय करतात आणि यापैकी अनेकांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची असते, असे आढळून आले आहे. पर्यटनस्थळ असल्याने किनारपट्टी भागात विदेशी महिला वेश्या व्यवसायातही असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या आठवड्यात कळंगुट पोलिसांनी तांझानियाच्या दोन आणि युगांडाच्या दोन अशा चार महिलांना वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक केली. त्याच्याकडे वैध ट्रॅव्हल डॉक्युमेंट नव्हते, अशी माहिती निरीक्षक नोलेस्को रापोझ यांनी दिली. ड्रग्स व्यवहारापासून एटीएम फोडण्यापर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये आता विदेशी नागरिकच दिसू लागले आहेत. २0१७ पासून आतापर्यंतची आकडेवारी जर नजरेखाली घातली तर २६२ विदेशी नागरिकांविरुध्द गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली. विदेशी पाहुण्यांवर अत्याचार केले जातात असा गळा काढला जातो परंतु या दोन वर्षातील आकडेवारी पाहता केवळ ४0 अशी प्रकरणे नोंद झाली त्यात १२ अपघात प्रकरणे होती.
गोव्यात दरवर्षी साधारणपणे ७ लाख विदेशी पर्यटक भेट देत असतात. अलीकडच्या काळात रोमानियन नागरिक एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यांमध्ये सापडलेले आहेत. रशियन नागरिक ड्रग्स व्यवसायात आढळतात. याशिवाय खून, बलात्कार, फसवणूक, वेश्या व्यवसाय आदी गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग आढळून येतो. केनया, तांझानिया, घाना, जर्मनी, नेपाळ, जॉर्जिया, दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही यात समावेश असतो. २0१८ मध्ये १२६ विदेशींवर गुन्हे नोंद झाले. बेकायदा वास्तव्य करुन राहणाऱ्या विदेशींना स्थानबध्द करुन ठेवण्यासाठी गेल्या मे महिन्यात म्हापसा येथे विशेष केंद्र पोलिसांनी उघडले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात आता अशा विदेशींची रवानगी करण्याचे काम सुरु झाले आहे.