माघार घेण्यासाठी अनेक ऑफर्स, आरजी मागे हटण्यासाठी जन्मलेली नाही: मनोज परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 10:33 AM2024-05-10T10:33:27+5:302024-05-10T10:34:43+5:30
पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी आम्हाला अनेक ऑफर्स होत्या, परंतु आरजी माधार घेण्यासाठी जन्मलेली नाही. आजवर गोवेकरांनी नेहमीच तडजोडीचे राजकारण पाहिले आहे. आरजी स्वार्थासाठी कधीही अशा तडजोडी करणार नसल्याचे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार वीरेश बोरकर, दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट पेरेरा, सचिव शैलेश नाईक, खजिनदार अजय खोलकर, गौरेश मांद्रेकर आदी उपस्थित होते. परब म्हणाले की, गोव्यातील निवडणुकांचा ट्रेंड बदलतोय. प्रचारात जाती, धर्माचे राजकारण केले जाते. धर्म संकटात आहे, असे सांगून मते मागितली जातात. लोकशाही व भारतीय राज्यघटना बाजूलाच राहिली आहे. काँग्रेस व भाजपने धर्माच्या नावाने लोकांना भडकाविण्याचे काम केल्याचा आरोपही परब यांनी केला.
आम्ही निवडणूक लढविताना कुणा बिल्डर लॉबीकडून, इतर पक्षाकडून, कॅसिनो लॉबीकडून निधी न घेता केवळ आर्थिक मदतीने व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवली. सांत आंद्रेसारख्या मतदारसंघात इतरांनी मतदारांना पैसे वाटले. जाहीर सभांमधून सरकारी नोकऱ्या, त्याचबरोबर अनेक दिशाभूल करणारी आश्वासनांच्या खैराती वाटल्या. परंतु, आम्ही निस्वार्थी भावनेने केवळ गोमंतकीयांच्या हक्कांसाठी ही निवडणूक लढविल्याचे परब म्हणाले.