तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:00 PM2019-08-08T12:00:39+5:302019-08-08T12:01:06+5:30
शेकडो लोकांना हलवले : रात्री आठच्या सुमारास घरांत शिरले पाणी, वीज खंडित, लोक भयभीत
पणजी - महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरु असल्याने गोव्यातील डिचोली तालुक्यांतील गावांना पुराचा तडाखा बसलेला आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. वीज ट्रान्सफार्मरच पाण्याखाली गेल्याने विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांचे हाल सुरु झालेले आहेत.
डिचोली तालुक्यातील साळ ( लोकसंख्या 2000) मेणकुरे (1800), नानोडा (1000) आमोणे (4500) आदी गावांना पुराचा तडाखा बसला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर आदींनी या गांवाना भेट देऊन पूगस्त लोकांना दिलासा दिला. घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
धरणातूनपूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यामुळे सालसह अनेक गावांना पुराने वेढलेले आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरू लागल्याने लोक घाबरले आणि सुरक्षितस्थळी आसरा शोधू लागले. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, खंडित वीज आणि घरांत शिरणारे पाणी यामुळे लोक संतप्त आणि भयभीत झालेले होते. भूमिका मंदिर परिसरातील सखल भागात सुमारे 100 हून अधिक जणांना रात्री उशिरा बोट व इतर माध्यमांचा वापर जारून पंचयात सभागृहात हलविण्यात आले आहे .
पातळी 43.30 मीटर
तिलारी धरणाची धोक्याची पातळी 43.60 मीटर आहे. सध्या ही पातळी 43.30 मीटर झाल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून डाव्या कालव्याद्वारे धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणाचा चौथा दरवाजा उघडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला व नदीपात्रातील संरक्षक भिंत ओलांडून पाणी घोटगेवाडी गावातील सखल भागात घुसले.