गोव्यातील 4 अभयारण्यांमध्ये होणार वाघांच्या हालचालींचे मॅपिंग, राखीव व्याघ्रक्षेत्र जाहीर करण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 01:56 PM2018-04-16T13:56:40+5:302018-04-16T13:56:40+5:30
गोव्यातील म्हादई, मोलें, खोतिगांव आणि नेत्रावळी अभयारण्यांमध्ये वाघांच्या हालचालींचे सविस्तर मॅपिंग होणार आहे.
पणजी : गोव्यातील म्हादई, मोलें, खोतिगांव आणि नेत्रावळी अभयारण्यांमध्ये वाघांच्या हालचालींचे सविस्तर मॅपिंग होणार आहे. हे भाग राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाची मंजूरी लागणार आहे. वन खात्याने २0१६ व २0१७ साली या अभयारण्यांमध्ये काही ठिकाणी कॅमेरे बसविले होते. त्यातून प्राप्त झालेल्या छायाचित्रांव्दारे या भागांमध्ये वाघांचे अस्तित्त्व असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांनी सांगितले. त्याआधी २0१३ साली व्याघ्र गणना हाती घेण्यात आली होती परंतु त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. कॅमे-यांमुळे वाघांचे अस्तित्त्व स्पष्ट झालेले आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या हद्दीच्या भागात खास करुन चोर्ला घाटात वाघांचे अस्तित्त्व दिसून आलेले आहे, असा दावा करण्यात आला.
सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघांचे अस्तित्त्व शोधून काढण्यासाठी या अभयारण्यांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव राज्य वन्यप्राणी मंडळासमोर ठेवला जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाकडून मंजुरी मिळताच राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाकरडे प्रस्ताव पाठवला जाणार असून तेथूनच निधी मिळवला जाईल. दरम्यान, २0११ साली केंद्रीय वन तथा पर्यावरण मंत्रालयाने म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची सूचना गोवा सरकारला केली होती. मात्र तत्कालीन सरकारने ते गंभीरपणे घेतले नाही. याबाबतीत २0१४ साली केंद्राने राज्य सरकारला स्मरणपत्रही पाठवले होते.