मांद्रेतील उमेदवारीचा तिढा कायम, प्रचार मात्र जोमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:38 PM2019-02-07T12:38:44+5:302019-02-07T12:39:04+5:30
शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे.
म्हापसा : शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे. असे असले तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. देवाला साक्षी मानून प्रचार कार्य जोमाने सुरू केले आहे.
विद्यमान विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांनी आमदारकीचे राजीनामे सादर केल्यानंतर रिक्त झालेल्या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुकांची तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होणार असले तरी भाजपा आणि काँग्रेस पक्षात उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने कायम आहे.
तिढा कायम असला तरी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन पुन्हा भाजपावासी झालेले माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या प्रचार कार्याला जोमाने सुरुवात केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आपल्या देवतेला साक्षी मानून त्याला नारळ ठेवून प्रचार कार्य सुरू केले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार आपणच असणार असल्याचे मतदारांना सांगून प्रचार करु लागले आहेत. दुस-या बाजूने माजी मुख्यमंत्री तसेच 2017च्या विधानसभा निवडणुकीत सोपटेंकडून पराभव स्वीकारलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आपला प्रचार सुरू केला आहे.
दुस-या बाजूने काँग्रेस पक्षातील उमेदवारी मिळवण्यावर सुद्धा तीन उमेदवारात तिढा निर्माण झालेला आहे. माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले असून माजी शिक्षण मंत्री संगीता परब यांचे पुत्र सचिन परब तसेच पक्षाचे उपाध्यक्ष बाबू बागकर हे सुद्धा उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असल्याने कॉँग्रेस पक्षातील तिढ्याला कारण ठरले आहे. या तिघांनीही आपला प्रचार सुद्धा सुरू केला आहे. या दोन्ही पक्षाला आव्हान देण्यासाठी जीत आरोलकर या अपक्ष उमेदवाराने सुद्धा आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना मगोपकडून उमेदवारी देण्यावर चर्चाही सध्या सुरू झाली आहे.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीवेळी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने भाजपाकडून खेचून आणून विजयश्री मिळवलेला होता. त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ पुन्हा स्वत:कडेच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारसंघावरील गेलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार असून सोपटे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यास ते सुद्धा आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीला लागले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे सुद्धा गमावलेले आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून करणार आहेत. सध्या निर्माण झालेला तिडा मांद्रेतील एकूण राजकीय स्थितीत आणखीन रंगत भरू लागला आहे.