म्हापसा: तरूण तेजपाल विरूद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:26 AM2018-03-15T11:26:46+5:302018-03-15T11:26:46+5:30
सहकारी महिला पत्रकारावरील कथित बलात्कार प्रकरणातील संशयीत आरोपी तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरूद्धच्या खटल्याची तीन दिवशीय ईन कॅमेरा सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आहे.
म्हापसा : सहकारी महिला पत्रकारावरील कथित बलात्कार प्रकरणातील संशयीत आरोपी तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरूद्धच्या खटल्याची तीन दिवशीय ईन कॅमेरा सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आहे. सुनावणी गुरुवार, दि. १५ रोजी सकाळी १० वा. सुरू झाली. यावेळी न्यायालयात पीडित महिला पत्रकार, तरुण तेजपाल, या प्रकरणातील तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत तसेच दोन्ही पक्षाचे वकिल उपस्थित होते. सुनावणी पिडीत महिलेच्या जबानीतून सुरू होण्याची शक्यता आहे.
२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दि. १५ ते १७ मार्च रोजी सुनावणी निश्चित केली होती. या काळात ईन कॅमेरा पीडित महिलेची जबानी व उलट तपासणी होईल. बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये नोव्हेंबर २०१३ मध्ये हा कथित बलात्काराचा प्रकार घडला होता. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संशयीत तेजपाल यास अटक करून त्याच्या विरूद्ध खटला दाखल केला होता. २८ सप्टेंबर २०१७ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने संशयीताविरूद्ध आरोप निश्चित केले होते. सत्र न्यायालयाच्या आरोप निश्चितीच्या आदेशात संशयीत आरोपी तेजपाल यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेला आव्हान अर्ज गेल्या २० डिसेंबर २०१७ रोजी खंडपीठाने फेटाळून लावला होता.