मराठा मित्रमंडळाचे गोव्यात मोठे योगदान : पार्सेकर
By admin | Published: March 2, 2015 01:20 AM2015-03-02T01:20:01+5:302015-03-02T01:21:54+5:30
मडगाव : गोव्याच्या जडणघडणीत मराठा मित्रमंडळाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रवींद्र भवनात शिवजयंती
मडगाव : गोव्याच्या जडणघडणीत मराठा मित्रमंडळाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रवींद्र भवनात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
या वेळी व्यासपीठावर रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एम. एस. मोटनकर, मराठा मित्र मंडळ गोवाचे अध्यक्ष रघुनाथ दळवी व प्रमुख वक्ते म्हणून सुजित माने उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोव्याला देश स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षांनी मुक्ती मिळाली, त्यामुळे तीन पंचवार्षिक योजनांना गोव्याला मुकावे लागले. गोवा मुक्त झाल्यानंतर शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध सरकारी नोकऱ्यांसाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकांची या पदावर नियुक्ती केली. काहीजण संचालकपदावरून निवृत्त झाले. आज त्यांची पिढी उच्चशिक्षित होऊन गोव्यातच नोकरी क रू लागली आहे.
जरी विविध ठिकाणी नोकरी करत असले तरी गोव्यात राहिल्यामुळे गोवेकर बनले आहेत. त्यामुळे गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पार्सेकर यांनी केले.
चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतुलनीय कार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य आजही सर्वांच्या मनात टिकून आहे. दरवर्षी त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी शिवजयंती साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण झाल्यावर सर्वाच्या अंगात नवीन ताकद, नवी ऊर्जा निर्माण होते, असे ते म्हणाले.
दामोदर नाईक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण आपल्या देशावर होत असून हे कुठेतरी थांबवले पाहिजे. जुन्या रूढी, परंपरा नव्या पिढीला देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, नाहीतर एक दिवस भारतीय संस्कृतीच चांगली होती, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, असे ते म्हणाले.
या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एम. एस. मोटनकर यांचा मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मराठा मित्रमंडळाच्या वतीने पार्सेकर, दामोदर नाईक, सुजित माने यांचा सत्कार करण्यात आला.
(प्रतिनिधी)