गोव्यात जूनमध्ये मराठी चित्रपट महोत्सव
By Admin | Published: May 6, 2016 08:51 PM2016-05-06T20:51:46+5:302016-05-06T20:51:46+5:30
३ ते ५ जून या कालावधीत नववा मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 6- येथे ३ ते ५ जून या कालावधीत नववा मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिनेश भोसले यांचा ‘एनिमी?’ या कोकणी चित्रपटाचा खेळ होईल. ही माहिती आयोजन समितीतर्फे दिग्दर्शक ज्ञानेश मोघे यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्यासमवेत विन्सन ग्राफिक्सचे संजय शेटये, श्रीपाद शेटये, उदय म्हांबरे उपस्थित होते.
महोत्सवात यंदा एकूण १६ चित्रपट पाहता येतील. राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले ‘रिंगण’ (दिग्दर्शक मकरंद माने), ‘सैराट’ (नागराज मंजुळे), ‘कट्यार काळजात घुसली’ (सुबोध भावे), ‘डॉट कॉम मॉम’ (मीना नेरुरकर), ‘वन वे तिकीट’ (कमल नथानी) या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना महोत्सवात घेता येईल.
या चित्रपटांशिवाय ‘नटसम्राट’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘हलाल’, ‘कौल’, ‘रंगा पतंगा’, ‘सायलेन्स’, ‘वक्रतुंड महाकाय’ अशा उल्लेखनीय चित्रपटांचेही खेळ होतील.
प्रदर्शित न झालेल्या
चित्रपटांचे खेळ
‘बिस्कीट’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘परतु’ हे प्रदर्शित न झालेले चित्रपट महोत्सवात पाहता येतील.
गाण्यांविषयी कार्यशाळा
महोत्सवाच्या दोन दिवस अगोदर ‘चित्रपट गीते’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गीतकार या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे.
येथे होणार प्रदर्शन
या महोत्सवात प्रदर्शित होणारे चित्रपट कला अकादमी, मॅकनिझ पॅलेस आणि आयनॉक्स येथे दाखविण्यात येतील.
कृतज्ञता पुरस्कारासाठी
वर्षा उसगावकर यांची निवड
महोत्सवात दरवर्षी ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी गोमंतकन्या असलेली अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची निवड केली आहे.