मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, ‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ मध्ये उमटले सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:28 PM2024-04-27T15:28:56+5:302024-04-27T15:30:20+5:30
‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ आझाद भवन, पर्वरी येथे पार पडले.
नारायण गावस
पणजी: मराठी ही गाेव्याची राजभाषा झाली पाहिजे. मराठी ही गाेव्याची असून राज्याने अनेक मराठी लेखक कवी निर्माण केले आहेत. त्यामुळे मराठीचा जयजयकार हा गोव्यात झाला पाहिजे असा सुर शनिवारी पर्वरी येथे पार पडलेल्या मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४ मध्ये उमटला. मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ आझाद भवन, पर्वरी येथे पार पडले. याचे उद्घाटन नागपूर येथील महाकवी सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे उद्घाटक महाकवी सुधाकर गायधनी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिले तसेच अन्य मराठी संमेलने पाहिली पण मराठी राजभाषा साहित्य संमेलन प्रथमच पाहत आहोत. गाेव्यात मी प्रथमच आलाे आहो पण गाेमंतकीयांचे मराठी विषयी असलेले प्रेम तसेच त्यांचे मराठी साहित्य पाहून गाेमतकांची मराठी राजभाषा करावीच लागणार आहे. मराठी जगात सुंदर भाषा आहे. या एका भाषेचे ७० बाेली भाषा आहेत. मराठीत माेठे साहित्य आहे, असे ते म्हणाले.
गायधनी पुढे म्हणाले कवी असो किंवा लेखक त्यांना पुरस्कारांपेक्षा रसिक महत्वाचे असतात. रसिकांची जागा ही पुरस्कारांपेक्षा मोठी असते. कवी हा व्यक्त कलावंत आहे तर रसिक हा अव्यक्त कलावंत आहे. कधीही कवीने आपल्या कवितेतून कुणाची विडंबना करु नये. प्रत्येक कवी तसेच लेखकाला अहंकार असायला पाहिजे पण तो अहंकार सुंदर असायला पाहिजे. राजकारणातील मंत्री आमदार खासदार सर्वजण एक दिवस माजी होतात पण कवी लेखक हा कधीच माजी होऊ शकत नाही असे ते म्हणाले.
यावेळी संमेलनाध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनीही गोमंतकातील मराठी भाषेचे महत्व याविषयी आपले विचार व्यक्त केेले ते म्हणाले मराठी ही गाेमंतकाची खरी भाषा आहे त्यामुळे ती गोमंतकाची राजभाषा झालीच पाहिजे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला स्वागताध्यक्ष म्हणून मराठी असे आमुची मायबोलीचे अध्यक्ष प्रकाश य. भगत, कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री पौर्णिमा देसाई तसेच गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, गोमंतक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, गुरूदास सावळ, संजय हरमलकर सन्माननीय अतिथी म्हणून ॲड. अमित सावंत माजी सरपंच मांद्रे, डॉ. गुरुदास नाटेकर, प्रभाकर ढगे यांची उपस्थिती होती.