माऊंट अबूच्या दौऱ्यासाठी विरोधी नगरसेवकांचा मडगाव पालिकेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:12 PM2020-01-15T19:12:09+5:302020-01-15T19:12:43+5:30
पूजा नाईक यांच्याकडून ठोस प्रत्युत्तर
मडगाव: मडगावच्या विविध भागातून टीकेचा झोड उठल्यावर माऊंट अबू येथील नगरसेवकांचा अभ्यास दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र आम्हाला न विचारता हा दौरा कसा रद्द केला असा सवाल करुन विरोधी गटातील नगरसेवकांनी बुधवारच्या नगर मंडळाची बैठक डोक्यावर घेतली. डॉरीस टेक्सेरा यांच्यासह काही विरोधी नगरसेवक नगराध्यक्ष पूजा नाईक यांच्या आसनाकडे धावत जाऊन तावातावाने बोलू लागल्याने शेवटी नाईक यांना आपला आवाज वाढवित शिस्त पाळा हा काही मासळी बाजार नाही असे या नगरसेवकांना सुनवावे लागले.
मडगाव नगरपालिकेचा कार्यकाळ संपत आल्यामुळे माऊंट अबू येथे अभ्यास दौऱ्याला जाऊन हे नगरसेवक काय करतील असा सवाल शॅडो कौन्सिलसह मडगावातील कित्येकांनी उपस्थित करुन मडगावकरांच्या पैशांची नासाडी अशाप्रकारे करु नये अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेची कदर करीत यापुर्वी नाईक यांनी मडगावचे नगरसेवक दौऱ्यावर जाणार नाहीत असे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेचे लोकांनी स्वागतही केले होते.
मात्र बुधवारी विरोधी नगरसेवकांनी हा प्रश्र्न लावुन धरला. सुरुवातीपासुनच त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. मात्र या बैठकीत महत्वाच्या प्रश्र्नावर चर्चा करायची आहे त्यामुळे दौ:यासंदर्भात नंतर बोलू असे सांगून नाईक यांनी इतर प्रश्र्न हाताळले. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला असता, आपण दौरा रद्द केलेला नाही. जर कुणालाही दौ:यावर जायचे असेल तर त्यांनी अवश्य जावे. केवळ फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक दौऱ्यावर जाणार नाहीत असे आपण यापूर्वी स्पष्ट केले होते असे त्यांनी सांगितले. नाईक यांची नगराध्यक्ष म्हणून ही पहिलीच बैठक होती. ही बैठक त्यांनी समर्थपणो हाताळत विरोधी नगरसेवकांना शिस्तीचे काही धडेही शिकविले.
या बैठकीत कार्निव्हलच्या मिरवणुकीच्या रस्त्यासंदर्भातही नगरसेवक दामू नाईक यांनी प्रश्र्न काढताना पूर्वीच्याच मार्गाने ही मिरवणुक घेण्यात यावी अशी मागणी केली. मात्र या मिरवणुकीसाठी रवींद्र भवन समोरील मार्ग अतिशय योग्य असल्याने मार्गात बदल केला जाणार नाही हे नाईक यांनी स्पष्ट केले. यावर भाजपाचे नगरसेवक केतन कुरतरकर यांनी तसे तर आम्ही यावेळी कार्निव्हलच्या दोन मिरवणुका आयोजीत करु असे सांगितले.
सोनसडय़ावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर रेमेडिएशन पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यातून जो टाकाऊ कचरा तयार होतो तो साठवून ठेवण्यासाठी सोनसडय़ा जवळच जागा निश्र्चित केली आहे. तर इनर्ट साठवुन ठेवण्यासाठी कदंब बस स्थानकासमोरील पार्किगची जागा तात्पुरती वापरली जाईल असे नाईक यांनी यावेळी सांगितले. हा कचरा भरावासाठी कोंकण रेल्वेने घ्यायचा ठरवला आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कचऱ्याचा अहवाल आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या विविध विकास कामांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. नावेलीच्या सितारा मोटर्स ते होली क्रॉस र्पयतच्या रस्त्याला डॉ. फ्रान्सिस लुईस गोमीस यांचे नाव द्यावे असा नगरसेवक जाफर बुदानी यांनी आणलेला ठराव संमत करण्यात आला. एसजीपीडीए मार्केटसमोर मडगाव पालिकेच्या मालकीची जी जागा आहे ती व्यापारी प्रदर्शनासाठी वापरायचा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला.