उच्चशिक्षित तरुणाने फुलवलेली झेंडूची शेती ठरतेय आदर्श; स्वावलंबनाकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 08:00 AM2024-11-07T08:00:50+5:302024-11-07T08:01:56+5:30

सध्याचा युवावर्ग सरकारी नोकरीच्या मागे धावत असल्याचे दिसून येते.

marigold farm flourished by a highly educated youth is ideal a step towards independence | उच्चशिक्षित तरुणाने फुलवलेली झेंडूची शेती ठरतेय आदर्श; स्वावलंबनाकडे पाऊल

उच्चशिक्षित तरुणाने फुलवलेली झेंडूची शेती ठरतेय आदर्श; स्वावलंबनाकडे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : सध्याची सुशिक्षित वाढती बेरोजगारी आणि जागतिक आर्थिक मंदीत अनेक तरुण नोकरी, व्यवसायाच्या शोधात भरकटत आहेत. अशातच बी. कॉम. पदवीधर तसेच संगणकाचे अद्ययावत ज्ञान, त्याचबरोबर अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तांत्रिक उद्योजकता विकास यासंदर्भातही प्रशिक्षण घेतलेल्या तालुक्यातील आकारवाडा-म्हार्दोळ येथील गौरेश गावडे या सुशिक्षित तरुणाने स्वकष्टातून स्वावलंबीपणे कमाई करण्याच्या हेतूने आपल्या शेतमळ्यामध्ये झेंडूची शेती केली आहे.

सध्याचा युवावर्ग सरकारी नोकरीच्या मागे धावत असल्याचे दिसून येते. सर्वांनाच सरकारी नोकरी मिळणे शक्य नसल्याचे अनेकदा मंत्रीच सांगत असतात. तरीही सरकारी नोकरीच्या आशेवर असणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या काही कमी नाही. अशातच गौरेश तुळशीदास गावडे या तरुणाने झेंडूच्या रोपांची लागवड करून नैसर्गिक संकटाला न घाबरता जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत केसरी, पिवळ्या झेंडूच्या फुलांची शेती बहरवली आहे. अधून- मधून पडणारा पाऊस वादळवारा याचा सामना करत त्याने लावलेल्या झेंडूचे उत्पादन आता बाजारात विक्रीसाठी तयार झाले असून, ग्रामीण भागात शेती करून आज हा तरुण झेंडूची फुलं घरपोच विकत आहे. ही उत्तम दर्जाची फुले ४ ते ५ दिवस ताजी राहतात, फ्रीजमध्ये ठेवल्यास आणखी दहा-पंधरा दिवस चांगली टिकतात. गणपती, दसरा, दिवाळी या सणावारात या फुलांना चांगली मागणी होती.

मेहनतीच्या जोरावर पुन्हा उभी केली रोपे 

जेव्हा सुरुवातीला झेंडू शेती केली तेव्हा वादळी वारा व गडगडाटासह पडलेल्या पावसात झेंडूची रोपं पडली होती. तरीही न डगमगता सर्व पडलेल्या रोपांना आधार देऊन या रोपांची निगा राखत पुन्हा ती उभी करण्यासाठी तसेच फुलांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जवळपास सहा ते सात वेळा योग्य फवारणी या फुलांच्या रोपावर करण्यात आली. उत्पादन खर्च वाढत असला तरी, कठोर मेहनतीने रोजगाराची चांगली संधी मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण गोरेश गावडे यांनी दाखवून दिले आहे. बेरोजगार तरुणांनी बोध घ्यावा, अशीच झेंडूची शेती त्यांनी फुलवली आहे.


 

Web Title: marigold farm flourished by a highly educated youth is ideal a step towards independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.