अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 08:57 AM2023-11-07T08:57:39+5:302023-11-07T08:59:01+5:30
मेपर्यंत ६६ मुहूर्त, ४४ गोरज.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदा अधिक श्रावण मासामुळे दिवाळी तसेच लग्नाचे मुहूर्तही पुढे गेले आहेत. साधारणत: दिवाळी ही ऑक्टोबरमध्ये असते. मात्र, अधिकमासामुळे यंदा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह व त्यानंतर लग्न समारंभांना सुरुवात होईल. यंदा नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत विवाहाचे ६६ मुहूर्त आहेत. यात ४४ गोरज मुहूर्ताचा समावेश आहे.
"जानेवारी ते एप्रिल २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत विवाहाचे एकूण २७ मुहूर्त आहेत. यात जानेवारीत ९ फेब्रुवारीत ११ मार्च १० तर एप्रिलमध्ये ३ मुहूर्ताचा समावेश आहे. या चार महिन्यांत मुहूर्त कमी असल्याने लोकांची लगीनघाई वाढली असून, हॉल बुकिंग आदी तयारीला वेग आला आहे.
नोव्हेंबरमध्ये तीनच मुहूर्त
हिंदू परंपरेत तुळशी विवाहानंतर लग्न समारंभांना सुरुवात होते. यंदा २८ नोव्हेंबरपासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. या महिन्यात केवळ तीनच मुहूर्त आहेत. यात २८ रोजी सकाळी ९:३९ वाजता व १०:५४ वाजता, तर २९ नोव्हेंबर सकाळी ११:१९ वाजता या मुहूर्ताचा समावेश आहे.
मे, जूनमध्ये नाही मुहूर्त
तुळशी विवाहानंतर जून अखेरपर्यंत लग्नसमारंभ चालतात. मात्र यंदा मे व जून या दोन महिन्यांमध्ये विवाहासाठी योग्य असे कुठलेही मुहूर्त नाहीत. त्यामुळे विवाह इच्छुकांना एक तर में पूर्वी किंवा जुलै महिन्यात ठरावीक मुहूर्तावरच लग्न करावे लागणार आहे.
गोरज मुहूर्त म्हणजे काय?
गोरज मुहूर्त हा सायंकाळी सूर्यास्ताच्या आसपास असतो. साधारणतः गायी गोठ्याकडे येण्याची वेळ असतानाचा मुहूर्त म्हणजे गोरज मुहूर्त असे मानले जाते. सध्या गायी शहरात फारशा नसतात. मात्र असे असूनही आधुनिक जीवनशैलीत गोरज मुहूर्ताला अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण गोरज मुहूर्तावर लग्न विधी करतात.
डिसेंबरमध्ये ७ गोरज मुहूर्त
डिसेंबरमध्ये एकूण ७ गोरज मुहूर्त आले आहेत. यात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, ८ रोजी सायंकाळी ५:५३ वाजता, १५ रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, १७ रोजी सायंकाळी ५:५६ वाजता, २० रोजी सायंकाळी ५:५८ वाजता, २१ रोजी दुपारी १२:३८ वाजता व ३१ रोजी सायंकाळी ६:०४ वाजता या मुहूर्ताचा समावेश आहे.