मडगावचा मास्टर प्लान तयार पण...: कामत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 08:10 AM2024-01-19T08:10:38+5:302024-01-19T08:11:32+5:30
सरकारकडे अर्थसंकल्पात निधीची मागणी करणार.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: मडगाव शहराचा मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. इंजिनिअर, तांत्रिक विभागातील अधिकारी आणि आर्किटेक्चर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही हा प्लान कळणार नाही. मडगाव पालिकेतील नगरसेवकांना या आराखड्याचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. सर्वांनाच हा प्लान दाखवीत बसल्यास अनेकजण वैयक्तिक अडचणी मांडत बसतील. आराखडा तयार होऊ शकणार नाही. यासाठी काही बदल करून अंतिम आराखडा तयार झाल्यास येणाऱ्या अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी करणार, अशी माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी गुरुवारी दिली.
मास्टर प्लान व त्याचे महत्त्व लोकांना समजण्याआधी काही पायलट प्रकल्प हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मडगाव शहराचा मास्टर प्लान संबंधित एजन्सीकडून तयार करण्यात आला आहे. ही एजन्सी वाळपई, फोंडा, मडगाव व वास्को शहराचा मास्टर प्लान तयार करणार आहे.
मडगाव पालिकेचे नगरसेवकांना मडगाव पालिकेत प्रेझेंटेशन देण्यात आले. त्यानंतर तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना एका हॉटेलमध्ये प्रेझेंटेशन देण्यात आले जे काही बदल असतील ते पुढील तीन दिवसांत केले जातील व आराखडा पणजी कार्यालयात सादर केला जाईल. तसे न केल्यास मास्टर प्लान तयार होणे शक्य नाही. नागरिकांसाठी आराखडा खुला केला तर त्या ठिकाणी ५० ते १०० जण येऊन आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यातून हरकती घेत अडचणीत आणतील, असे कामत म्हणाले.
आराखड्यात एजन्सीकडून अनेक बदल सुचविलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी आपण काही सांगू शकत नाही. काही विकासकामे वगळलीदेखील जाऊ शकतात. राज्य सरकारकडून किती निधी खर्च केला जाऊ शकतो अशा सर्व पातळीवरील प्राथमिकता लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी केल्या जातील.
रिंग रोडवरील अपोलो व्हिक्टर रुग्णालयाकडे जागेचा विकास व्हिक्टर अलबुकर्क यांनी वैयक्तिक खर्च करून केला व त्यानंतरच लोकांना त्याचे महत्त्व समजले. मडगाव शहराचा आराखडा अंतिम करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येईल व येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्यात येईल, असे कामत यांनी सांगितले.