मटका जुगार पाडला कायमचा बंद, गोवा पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 10:07 PM2020-06-24T22:07:48+5:302020-06-24T22:08:25+5:30
मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या मटका अड्ड्यांवर छापामारीचे सत्र सुरू आहे.
पणजी : गोव्यात मटका जुगार कायमचा बंद केल्याचा दावा गोवा पोलिसांनी केला आहे. मंगळवारपासून मटका बंद झालेला आहे आणि तो पुन्हा सुरू करू दिला जाणार नसल्याचेही पोलिसांनी जाहीर केले आहे. मटका जुगाराला कायमची मूठमाती देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी मटका जुगार गोव्यात बंद पाडण्यात आल्याचे म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मटका जुगार सुरू होवू दिला जाणार नाही. सर्व पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.गोव्यात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा कल्याण व मुंबई मार्केट मटका जुगार मंगळवारी आणि बुधवारी बंद राहिल्याचा पोलिसांचा दावा आहे, परंतु बुधवारी दक्षिण गोव्यात काही ठिकाणी कल्याण जुगारासाठी पैसे मोठ्या प्राणावर लावले गेल्याचेही वृत्त आहे.
मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या मटका अड्ड्यांवर छापामारीचे सत्र सुरू आहे. गोव्यातील मटका जुगार बंद पाडावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वेळोवेळी मटका जुगार बंद पाडण्याचे आदेश दिले होते. या कामात पोलीस यंत्रणे कुचकामी ठरत असल्याचे पाहून मटका जुगारावर कारवाई करण्यासाठी मटकाविरोधी विशेष तपास पथकेही नियुक्त करण्यात आली होती. पोलीस केवळ छापे टाकतात मटका बंद करीत नाहीत असे चित्र पहायला मिळत होते. या पार्श्वभुमीवर मटका जुगार बंद पाडल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे हे एक दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकारी कार्तिक कष्यप हे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक असताना निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी एक मोठी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर मटका जुगारवाल्यांना ताब्यात घेतले होते. त्यात मटक्याचे प्रत्यक्ष नंबर काढणारेक्रमांक दोनचा मटका बॉसही पकडले गेला गेला होता. त्यामुळे दुस-या दिवशी कल्याण बाजार बंद ठेवावा लागला होता. हा एक दिवस बंद पडण्याचा प्रकार वगळता कारवाई करून मटका बंद पाडण्याचे प्रकार कधी झाले नव्हते.