माविनची महिलाशक्ती; बदनाम करण्यासाठी आरोप करत असल्याचे सूचित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 09:30 AM2023-09-05T09:30:25+5:302023-09-05T09:30:43+5:30

मंत्री गुदिन्हो यांच्या चिखलीतील या कार्यक्रमालाही अनेक महिला उपस्थित होत्या.

mauvin godinho goa women power | माविनची महिलाशक्ती; बदनाम करण्यासाठी आरोप करत असल्याचे सूचित

माविनची महिलाशक्ती; बदनाम करण्यासाठी आरोप करत असल्याचे सूचित

googlenewsNext

आपण सातवेळा विधानसभा निवडणूक जिंकलो असून, यामागे महिलाशक्तीचा मोठा हात आहे, अशा अर्थाचे विधान मंत्री माविन गुदिन्हो यांनी कालच्या शुक्रवारी केले. दाबोळी हा माविनचा मतदारसंघ आहे. एका विशिष्ट वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुदिन्हो नेमके काय बोलतात, याकडे दाबोळीचेच नव्हे, तर पूर्ण गोव्याचे लक्ष होते. शुक्रवारी चिखली येथे झालेल्या एका कार्यक्रमावेळी गुदिन्हो यांनी तोंड उघडले. आपल्याला काहीजण बदनाम करण्यासाठी भलते सलते आरोप करतात, असे गुदिन्हो यांनी सूचित केले. प्रत्यक्षात महिलाशक्ती आपल्यासोबत आहे, असे गुदिन्हो यांनी आपल्या विधानातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मंत्री गुदिन्हो यांच्या चिखलीतील या कार्यक्रमालाही अनेक महिला उपस्थित होत्या. अर्थात पुरुष मतदारही सहभागी झाले होतेच.

मंत्री गुदिन्हो यांनी गिरीश चोडणकर यांचे नाव घेतले नाही. चोडणकर यांनी ट्रिट केल्यानंतरच कथित सेक्स स्कैंडलची चर्चा राज्यभर सुरू झाली होती. अर्थात, चोडणकर यांनी कुठल्याच मंत्र्याचे नाव घेतले नव्हते. कथित सेक्स स्कँडलमध्ये कोण आहे, अशी विचारणा त्यांनी केली होती. मात्र काहीजणांनी भलते सलते अर्थ काढून सोशल मीडियावरून काही महिलांची बदनामी सुरू केली. जे अत्यंत चुकीचे होते. आरोप करताना कोणत्याच महिलेचा संबंध सेक्स स्कैंडलशी लावता येत नाही. मंत्र्यांच्या विरोधात असलेल्या राजकारण्यांनी आरोप करताना किंवा प्रश्न उपस्थित करताना खूप काळजी घ्यावी लागते. 

सोशल मीडियावरून ज्यांनी चिखलफेक केली, त्यांनी एका महिलेचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले. सत्तेतील राजकीय नेत्यांना टार्गेट करताना आपण महिलांची उगाच बदनामी करू नये, याचे भान काही अतिउत्साही मंडळींना असणे गरजेचे आहे. 'आज माका, फाल्या तुका ही कोकणी म्हण लक्षात ठेवावी लागेल. मंत्री गुदिन्हो यांनी चिखलीतील कार्यक्रमावेळी काही अतिउत्साहींचे कान पिळण्याचा प्रयत्न केला. मनात चांगले विचार आणले तर चांगलेच दिसेल. मनातील विचार अस्वच्छ असल्यास काहीजण अस्वच्छच बोलतील, श्रावण महिन्यात अस्वच्छ विचार व्यक्त होत असतील तर ते विचार किती नीच आहेत ते कळून येते, असे सांगण्याचा प्रयत्न माविन यांनी केला. तशी विधाने माविन यांनी करून विरोधकांना उपदेशाचा डोस पाजला. आपल्याविषयी चांगला विचार करा, असेच एक प्रकारे गुदिन्हो यांनी सुचविले आहे. गोवा छोटे राज्य आहे. सत्तेतील राजकीय नेत्यांना आणि विरोधातील नेत्यांनाही या प्रदेशातील जनता जवळून ओळखते.

एरव्ही चिखलातही कमळ फुलते, पण असाही चिखल असतो, जिथे कमळ फुलत नही, मग तो चिखल विनाकारण दुसऱ्यावर फेकण्यासाठी वापरला जातो, असे मंत्री गुदिन्हो बोलले. एका अर्थाने गिरीश चोडणकर यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न माविनने केला असावा. माविनला महिलांची मते मोठ्या प्रमाणात मिळतात, यात वादच नाही. ते एकेकाळी काँग्रेस पक्षात असतानाही खूप प्रभावी होते. 

गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी राजीव गांधी यांच्याकडून युवक काँग्रेससाठी विधानसभेची पाच तिकिटे मिळवून दाखविली होती. माविनना १९९४ नंतर पर्रीकरांनी वीज घोटाळ्याच्या विषयावरून घेरले. त्यामुळे त्यांची कारकीर्द अडचणीत आली होती. साल्ढाणा व पर्रीकर यांनी मिळून माविनला एकदा पराभवाच्या वाटेने ढकलले होतेच. माविन पराभूत होऊनही नंतर कुठ्ठाळीहून दाबोळी मतदारसंघात गेले व तिथे जिंकून आले. आज पर्रीकर, माथानी साल्ढाणा किंवा विल्फ्रेड मिस्किता हे तिघेही हयात नाहीत. 

मात्र, माविन मंत्रिपदी आहेत व भाजपमध्ये आहेत. हा काळाचा महिमा. त्यांना मतदारांची नाडी नीट कळली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही ते आपल्या माणसांना निवडून आणतात. साळ येथे त्यांचे फार्महाउस आहे. तिथेच ते जास्तवेळ राहतात. इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या माविनची भविष्यात कदाचित मुख्यमंत्री होण्याचीदेखील इच्छा असू शकते; पण भाजपमध्ये ते शक्य नाही. माविन कार्यक्षम व सक्रिय आमदार असल्याने निवडून येतात. महिलांचा परवा त्यांनी जास्त उदो उदो केला, त्यामागे महिलांचा आदर करणे की विरोधकांना उत्तर देणे हा हेतू होता, हे कळण्यास जास्त अभ्यासाची गरज नाही.

 

Web Title: mauvin godinho goa women power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा