पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:55 PM2019-05-03T12:55:32+5:302019-05-03T13:02:16+5:30
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला पोचला असून याला राजकीय रंग येऊ लागला आहे.
पणजी - विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांवरुन संघर्ष शिगेला पोचला असून याला राजकीय रंग येऊ लागला आहे. महापौरांनी कांपाल येथे बाल भवनासमोर पदपथ फोडण्याचे चाललेले काम बंद पाडल्यानंतर आयुक्त शशांक त्रिपाठी यांनी महापालिकेने मान्सूनपूर्व कामांसाठी नेमलेले कामगार काढून घेतले तसेच पर्यवक्षकाचीही बदली केली. यामुळे संतापलेल्या बाबुश गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सायंकाळी आयुक्तांना घेराव घालून जाब विचारला.
महापौर उदय मडकईकर यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांवर हल्लाबोल केला. सरकारच्या दबावाखाली येऊन आयुक्तांनी दादागिरी चालवली असल्याचे ते म्हणाले. मडकईकर म्हणाले की, कांपाल येथे पदपथ फोडण्याचे काम चालू होते. मात्र त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही परवाना स्मार्ट सिटीसाठी काम करणारी कंपनी सादर करु शकली नाही. वास्तविक खोदकाम करताना साइट प्लॅन द्यावा लागतो तोही दिलेला नाही. गुरुवारी सकाळी जॉगिंगसाठी जात असता या ठिकाणी एका वृध्दाचा पाय मुरगळला आणि त्याला दुखापत झाली. यासंबंधीची तक्रार आल्यानंतर मी स्वत: पाहणी केली तेव्हा हे काम बेकायदेशीररित्या चालू असल्याचे आढळून आल्याने बंद पाडले. फावडे, कुदळी आदी साहित्यही जप्त केले. या कारवाईनंतर सरकारच्या सांगण्यावरुन आयुक्तांनी साहित्य जप्तीची कारवाई केलेल्या सुपरवायझरची तडकाफडकी बदली केली.
मडकईकर यानी असाही आरोप केला की, ‘इमेजिन स्मार्ट सिटी प्रोजेक्ट डेव्हलॉपमेंट लिचे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी हे प्रत्येक बाबतीत महापालिकेला अंधारात ठेवत आहे. याआधीही त्यांना महापालिकेने बजावले होते. परंतु त्यांनी मनमानी चालूच ठेवली.’ सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घालताना जाब विचारुन यापुढे स्मार्ट सिटीसाठी खोदकामांच्या ठिकाणी कोणालाही इजा झाल्यास जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी लागेल, असा इशारा दिला.
दरम्यान, ‘इमेजिन स्मार्ट सिटीचे संचालक तथा भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी महापालिकेने जे काम बंद पाडले ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. स्मार्ट सिटीच्या प्रत्येक कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाना घेतलेला आहे. कामांच्या बाबतीत संयुक्त बैठक झाली त्यावेळी महापालिकेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. काम बंद पाडण्यासाठी महापौर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करु शकत नाही. याबाबतीत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.’