दक्षिण आशियाई शहरांच्या परिषदेत पणजीच्या प्लास्टिक मुक्तीची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 01:39 PM2020-03-07T13:39:18+5:302020-03-07T13:42:43+5:30

प्लास्टिक मुक्त पणजीसाठी महापालिकेनं १४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळालं आहे

mayor uday madkaikar tells the success story of plastic free panaji in south asian cities summit kkg | दक्षिण आशियाई शहरांच्या परिषदेत पणजीच्या प्लास्टिक मुक्तीची यशोगाथा 

दक्षिण आशियाई शहरांच्या परिषदेत पणजीच्या प्लास्टिक मुक्तीची यशोगाथा 

Next

पणजी: पणजी महापालिकेने १४ वर्षांपूर्वी घरोघरी कचरा संकलन करून विल्हेवाटीची जी पद्धत अवलंबिली आणि कालांतराने ही पद्धत कशी यशस्वी झाली तसेच पणजी शहर ९० टक्के प्लास्टिकमुक्त आणि कचरापेट्या मुक्त कसे झाले, याची यशोगाथा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी नुकत्याच गोव्यात भरलेल्या दक्षिण आशियाई शहरांच्या शिखर परिषदेत सांगितली.

परिषदेत उपस्थित देश-विदेशातील महापौरांना  तसेच नगराध्यक्षांना संबोधून मडकईकर म्हणाले की, १४ वर्षांपूर्वी महापालिकेने घरोघरी सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून संकलनाचे काम हाती घेतले, तेव्हा खरे म्हणजे ते मोठे आव्हान होते. त्यावेळचे महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कचरा विल्हेवाटीचे महत्व पटवून दिले आणि पालकांना याविषयी सांगण्यास सांगितले. याचा बराच परिणाम दिसून आला. पालकही कचऱ्याच्या बाबतीत जागृत झाले. प्लास्टिकमुक्तीच्या बाबतीत महापालिकेने गेल्या वर्षीच उद्दिष्टप्राप्ती केली आहे. पणजी शहर ९० टक्के प्लास्टिकमुक्त झालेले आहे. प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसल्यास किंवा विकताना आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जात आहे. पणजी शहराला वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल गेल्या डिसेंबरमध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. कचरा विल्हेवाटीचे बाबतीत आता प्रत्येकी पाच टनाचे मिनी कचरा प्रकल्प शहरात उभे करण्याची महापालिकेची योजना आहे, असे महापौर मडकईकर म्हणाले.

अलीकडेच शहरात सुरू केलेला पे पार्किंगचा विषयही महापौरांनी सहज आणि सोप्या भाषेत सांगितला. पार्किंगसाठी लवकरच मोबाईल ॲप आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोनापावल येथील तारांकित हॉटेलात झालेल्या या दोन दिवसीय परिषद देश-विदेशातील १०० हून अधिक महापौर नगराध्यक्ष उपस्थित होते. या परिषदेत शहरांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. महापालिका तसेच पालिका प्रमुखांना प्रशासकीय अधिकार बहाल करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

 गुजरातमधील सुरत महापालिकेचे महापौर डॉ. जगदीश पटेल यांनी गुजरातच्या ग्रामीण भागातून गरिबीमुळे सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर तसेच झोपडपट्ट्यांचा उल्लेख केला. प्रधानमंत्री आवास योजनेखाली झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आवास योजनेतून दीड लाख घरे बांधून दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक पालिकांचे नगराध्यक्ष या परिषदेत सहभागी झाले होते. अमरावतीच्या महापौर, वाईचे नगराध्यक्ष, श्रीनगरचे महापौर जुनैद अझीम मट्टू, अहमदाबादच्या महापौर श्रीमती बिजल पटेल याही सहभागी झाल्या होत्या. श्रीमती पटेल म्हणाल्या की, तेथे एका हॉस्पिटल इमारतीवर हेलिपॅडची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी इस्पितळात आणल्यास थेट इमारतीच्या छतावर उतरवून इस्पितळात आणले जाऊ शकते.

नेपाळमधील धुलिखेल महापालिकेचे महापौर अशोक कुमार, बांगलादेशमधील एका महापालिकेचे महापौर दिवान अहमद, भूतानमधील एका पालिकेचे नगराध्यक्ष नाम गय थेशरिंग आदी या परिषदेत सहभागी झाले होते. या सर्वांनी त्यांच्या पालिका क्षेत्रातील अडीअडचणी समस्या तसेच यांच्यासमोरील आव्हाने या परिषदेत स्पष्ट केली.
 

Web Title: mayor uday madkaikar tells the success story of plastic free panaji in south asian cities summit kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा