अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 04:11 PM2024-02-21T16:11:45+5:302024-02-21T16:12:55+5:30
जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती.
पेडणे : राष्ट्रीय महामार्गावर पोरस्कडे-धारगळ रस्त्यावरील न्हयबाग जंक्शनवर ब्लिंकर सिग्नल बसवण्यास अखेर बुधवारी सुरुवात झाली. या ठिकाणी सातत्याने झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मदार आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि स्थानिक पंचायत मंडळाच्या उपस्थितीत जंक्शनची २० फेब्रुवारी रोजी पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनी तातडीने या जंक्शनवर सिग्नल बसवावेत अशा सूचना आमदारांनी केल्या होत्या.
याशिवाय, जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती.
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या पाहणीनंतर पत्रकारांना सांगितले होते की, सिग्नलविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सिग्नल बसवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार या ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींसह समस्या सोडविण्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी साथ द्यावी असे आवाहन पेडणे तालुका विकास समितीचे निमंत्रक व्यंकटेश नाईक यांनी केले. पोरस्कडे पंचायतीसमोरून ते न्हयबाग-भटपावणीपर्यंत उड्डाणपूल उभारणे हाच एकमेव उपाय आहे. पोरस्कडे-अमेरे-न्हयबाग पंचायतीने ग्रामसभेत असा ठराव मंजूर करून सरकारकडे पाठपुरावा करावा, असे मत नाईक यांनी व्यक्त केले.
जनतेचा रोष
राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम पत्रादेवी ते धारगळ-महाखाजनपर्यंत एमव्हीआर कंपनी करत आहे. परंतु जमीन संपादनास विलंब लागला. त्यामुळे सर्व्हिस रोड करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे दिसते. सरकारने गावागावांना जोडणारे सर्व्हिस रोड, बगल रस्ते आणि त्यासाठी लागणारी जमीन अगोदर संपादित करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने कंत्राटदार, अभियंत्यांना जनतेचा रोष पत्करावा लागत आहे.