मुरगाव तालुक्यात पावसाळ्यापूर्वी डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:36 PM2020-05-01T17:36:01+5:302020-05-01T17:36:09+5:30
वास्को: पावसाळ्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य खात्याने त्वरित उपाययोजना सुरु करणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये दक्षिण गोव्यातील मुरगाव ...
वास्को: पावसाळ्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य खात्याने त्वरित उपाययोजना सुरु करणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील विविध भागात ११३४ हून जास्त डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णांवर इस्पितळात उपचार करण्यात आलेले होते. त्यातील चार जणांचे डेंग्यूसदृश्य तापावर उपचार घेताना निधन झाले. यात तीन पुरूष तर एका महिलेचा समावेश होता.
पावसाळा सुरू होण्यास अवघा एक महिना राहिला आहे. २०१९ वर्षांच्या सुरुवातीपासून डिसेंबरपर्यंत मुरगाव तालुक्यातील चिखली, दाबोळी येथे असलेल्या उपजिल्हा इस्पितळातच विविध भागात (वास्को, बायणा, नवेवाडे, वाडे, सडा इत्यादी) राहणा-या ११३४ डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णावर उपचार करण्यात आले होते. या व्यतिरिक्त मुरगाव तालुक्यातील विविध भागात असलेल्या खासगी इस्पितळातही अनेक डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आला होता. २०१९ सालात डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर तसेच अधिका-यांकडून विविध प्रकारची पाऊले उचलण्यात येत असल्याचे दिसून आले, मात्र याचा जास्त फायदा झाला नसल्याचे तेव्हा दिसून आले होते.
गेल्या वर्षी डेंग्यूमुळे ज्या प्रकारे मुरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. ती परिस्थिती यावर्षी होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने तसेच संबंधितांनी आतापासूनच पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. २०२० च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात डेंग्यू सदृष्य ताप आलेले काही रुग्ण उपचारासाठी आले होते, असे या इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.
डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राबरोबरच मुरगाव नगरपालिकेने तसेच इतर संबंधितांनी यासाठी पावले उचलण्यास सुरवात करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
लॉकडाऊननंतर कार्यवाही
पावसाळ्यात मुरगाव तालुक्यात डेंग्यूचा फैलाव होऊ नये, यासाठी सध्या वास्को शहरी आरोग्य विभाग विविध पाऊले उचलत असली तरी लॉकडाऊनमुळे काही मर्यादा येतात. ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर वास्को शहरी आरोग्य केंद्राचे अधिकारी - कर्मचारी विविध भागातील नागरिकांच्या घराच्या परिसरात जाऊन तपासणी करण्यास सुरवात करील. अनेक नागरिक बॅरलात, भांड्यात पाणी भरून उघडे ठेवत असून यात डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होते.
लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणा-या तपासणीत अशा प्रकारे डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आल्यास सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्यात येणार असल्याची माहिती वास्को शहरी आरोग्य केंद्राची प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी दिली. पावसाळ्यात डेंग्यूचे प्रमाण वाढत असून त्याच्यावर आळा घालण्यासाठी आम्हाला ३ मे नंतर सुमारे एक महिन्याचा काळ मिळणार असून आमच्या हद्दीतील भागात जास्तीत जास्त प्रमाणात डेंग्यूवर आळा घालण्यासाठी उचित पावले उचलली जाणार असे डॉ. खांडेपारकर यांनी पुढे सांगितले.