मेघना सहकार्य करेना! म्हार्दोळ पोलिसांचा दावा; समन्सना उच्च न्यायालयात दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:18 PM2023-08-13T13:18:56+5:302023-08-13T13:20:24+5:30
पोलिसांनी तीनवेळा पाठविलेल्या नोटिशीला तिने केराची टोपली दाखवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बाणस्तारी अपघातप्रकरणी परेश सिनाय- सावर्डेकर सध्या पोलिस कोठडीत आहे. तर या प्रकरणात त्याची पत्नी मेघना हिचेही नाव समोर आले आहे. मात्र, न्यायालयाने तिला अटकेपासून दिलासा देताना पोलिसांना सहकार्य करण्याचा आदेश दिला होता. मात्र, मेघना म्हार्दोळ पोलिसांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तीनवेळा पाठविलेल्या नोटिशीला तिने केराची टोपली दाखवली आहे.
या अपघात प्रकरणात सहा वाहनांना जबर धडक दिली. तपासात कार परेश चालवत असल्याचे समजताच पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच त्याला अटक केली. यावेळी कारमध्ये परेशच्या बाजूला पत्नी मेघना बसली होती. त्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडले, याची माहिती मेघनाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेण्यासाठी पोलिस स्थानकात बोलावले होते. त्यासाठी तीनवेळा समन्सही बजावण्यात आले होते. मात्र, एकही समन्स तिने जुमानले नाही, अशी माहिती म्हार्दोळ पोलिस स्थानकातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.
घरी येऊन जबानी घ्या!
- मेघना हिने पोलिसांच्या समन्सना महत्त्व दिले नाही आणि दुसऱ्या बाजूने आरोग्याच्या कारणावरून आपल्याला पोलिस स्थानकात जाणे शक्य नसल्याचा दावा करून पोलिसांच्या समन्सना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले.
- आरोग्याच्या कारणामुळे मी खासगी इस्पितळात उपचार घेत असल्यामुळे पोलिस स्थानकात जाऊ शकत नाही. पोलिसांना हवे असल्यास घरी येऊन जबानी नोंदवून घेण्यास सांगावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
- अटकेपासून दिलासा देताना न्यायालयाने या प्रकरणी तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचा आदेश दिला होता. मात्र, मेघना हिने हा आदेशही जुमानलेला नाही.
मेघनासह तिघांना पोलिसांनी घरी सोडले होते
बाणस्तारी येथे अपघात घडला त्या दिवशी मेघना सावर्डेकर आणि इतर तीन महिलांना पोलिसांनी घरी पोहोचविले, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. अपघात प्रत्यक्ष पाहणायांच्या मते कार महिला चालवित होती, आणि याबद्दल आपण पोलिस निरीक्षकांशी बोललो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
अपघातावेळी कार नेमके कोण चालवत होते, यावरुन वाद-विवाद सुरु आहेत. परेश कार चालवत होता, यावर पोलिस ठाम असताना काहीजण मेघना कार चालवत होती, असा संभ्रम पसरविण्याचे काम करत आहेत. हे जाणूनबुजून केले जात असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगताहेत. जेणेकरून न्यायालयात याचा फायदा संशयितांना होऊन दोघेही निर्दोष सुटू शकतील, असा हा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे.
अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देणार : मुख्यमंत्री सावंत
बाणस्ता अपघात पीडितांना सरकारतर्फे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. अपघातात दिवाडी येथील फडते दाम्पत्यासह पश्चिम बंगालमधील युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले असून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी गोमेकॉत जाऊन त्यांची विचारपूस केली. तिघांपैकी एकाच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याची पक्षाघात झाल्यासारखी स्थिती आहे. इतर दोघांपैकी एकाला दोन दिवसांनी तर दुसयाला एक आठवड्यांतर डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
उद्या बेल की जेल ?
अटक चुकविण्यासाठी मेघना हिने फोंडा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला असला तरी तो अंतरीम आहे. पोलिसांनी आपले म्हणणे न्यायालयात सादर केल्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालय आपला निवाडा सुनावू शकते. हा निवाडा मेघनाच्या विरुद्ध गेला तर तिलाही
तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. उद्या, सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे