पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:28 AM2019-04-30T11:28:47+5:302019-04-30T12:17:19+5:30
माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या.
पणजी - माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या. यावेळी प्रथमच पर्रीकर नाहीत पण पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणींना सर्वबाजूने यावेळच्या निवडणुकीत उजाळा दिला जात आहे. केवळ भाजपाचेच उमेदवार नव्हे तर विरोधात असलेले उमेदवारही विविध अर्थानी पर्रीकरांविषयीच्या आठवणी जाग्या करू लागले आहेत.
1994 सालापासून पर्रीकर कायम पणजीत जिंकले व त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. पर्रीकर यांनी पणजीत काँग्रेसच्या उमेदवाराला 1989 सालानंतर कधीच जिंकू दिले नाही. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर 2015 साली व 2017 सालीही पणजीत भाजपाचाच विजय झाला. काँग्रेसने तीस वर्षे पणजीत विजय अनुभवलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीत पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात हे दोघेही सक्रिय झाले आहेत. भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्यासाठी उत्पल व अभिजात प्रचार काम करत आहेत. कुंकळ्ळ्य़ेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रथम पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की पणजीत पर्रीकर यांनी जलदगतीने विकास केला. त्यामुळे पणजीचे लोक विकासासाठी यावेळीही मत देतील. पर्रीकर यांच्यावर पणजीतील लोकांनी खूप प्रेम केले. त्या प्रेमापोटीही लोक यावेळी मतदान करतील. पर्रीकर यांच्याच मार्गदर्शनाखाली व तालमीत पणजीत भाजपा कार्यकर्त्यांची टीम तयार झाली. दरम्यान, भाजपाविरुद्ध लढणारे प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, पर्रीकर यांच्याविषयी पणजीवासियांना आदर आहे. ते मोठेच नेते होते पण पणजीत आता सहानुभूती नाही व त्यामुळे भाजपाला पर्रीकर यांच्याविषयीच्या कोणत्याच सहानुभूतीचा लाभ निवडणुकीत मिळणार नाही.
पर्रीकरपुत्रही मनाचा दिलदार, 'पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करणार'
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पणजी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी नाकारलेले पर्रीकरपुत्र उत्पल यांनी पक्षाचा निर्णय आपल्याला शिरसावंद्य असल्याचे म्हटले. तसेच, राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी काम करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र उत्पल हेही तिकिटासाठी शर्यतीत होते. परंतु, भाजपाने त्यांना डावलून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना तिकीट दिले. त्या पार्श्वभूमीवर उत्पल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत ठरविले तर मी आहे, असे मी म्हटले होते. राजकारण स्वच्छ करण्यासाठी येण्याची इच्छा होती. पर्रीकर यांनीही नेहमी हीच इच्छा बाळगली आणि त्यांनाही सुरुवातीला बरेच अडथळे आले. राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आणि प्रचारातही सहभागी होणार.’