मुंबईतील पर्यटकांवर मेरशीत भ्याड हल्ला
By admin | Published: June 15, 2017 02:13 AM2017-06-15T02:13:40+5:302017-06-15T02:18:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आलेल्या वसई-मुंबईतील ५० पर्यटकांना गोव्याची सहल दहशतवादाच्या अनुभवाची ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : सुट्टी घालविण्यासाठी गोव्यात आलेल्या वसई-मुंबईतील ५० पर्यटकांना गोव्याची सहल दहशतवादाच्या अनुभवाची ठरली. मेरशी येथील चार गुंडांनी सुरे, कोयते आणि तलवारी घेऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात १४ जण जखमी झाले तर त्यांच्या बसची मोडतोड करण्यात आली. या घटनेमुळे गोव्याची देशात बदनामी झाली.
ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मेरशी येथील कदंब गेस्टहाउसजवळून सुटलेली पर्यटकांची बस (एमएच -०४- जी- ९४५०) विरुद्ध दिशेने येत विशाल गोलतकर, लॉरेन्स डायस, सूरज शेट्ये ऊर्फ बाबू आणि साई कुंडईकर या चौघा गुंडांनी रोखली. हातात लाठ्याकाठ्या व इतर शस्त्रे घेऊन ते आले होते. बसच्या काचा ते सपासप फोडू लागले. पैकी एक ड्रायव्हरसीटजवळ गेला आणि बसची चावी काढून घेतली तसेच चालकाला ओढून रस्त्यावर पाडले. चौघे मिळून त्याला लाठ्यांनी आणि लाथांनी त्याला मारत असताना बसमधील लोकांनी उतरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते गुंड तेथून गेले व लवकरच कोयता, तलवारी, सुरा वगैरे घेऊन परतले आणि चालकाला वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ला चढविला, त्यात १४ जण जखमी झाले. येथे जवळच दवाखाना असलेले डॉ. वासुदेव पै यांनी हल्ल्यातील जखमीवर प्रथमोपचार केले.
तलवारीचा तिरपा वार
मारहाण सुरू असलेल्या बसचालकाला वाचविण्यासाठी बसमधील माणसे पुढे सरसावली त्यात एक महिलाही होती. तलवारी व कोयते घेऊन आलेल्या गुंडांनी तिच्यावरही तलवारीचा वार केला; परंतु तो वार सरळ न जाता तिरपा गेला तो तिच्या हाताचे खालीपासून वरपर्यंत मांस कापून गेला.
रक्तबंबाळ स्थितीत तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. अमोल घोडकर याला लाठ्यांनी मारहाण केल्यामुळे त्याच्या खांद्याला जबर जखम झाली आहे.
रस्त्यावर आपटून मारहाण करण्यात आलेल्या चालक शिवाजी याचा पाय मोडला.
सुस्त पोलीस, बघे लोक
गुंड या पर्यटकांना मारत असताना आजूबाजूचे लोक पाहात होते; परंतु त्यांना रोखण्याचे धाडस कुणीच करीत नव्हते. तसेच जुने गोवा येथून पोलिसांना येण्यासाठीही बराच विलंब लागला. शेवटी आपल्या माणसांना मारताहेत ते सहन न होऊन बसमधीलच महिला व इतर लोक खाली उतरले आणि त्यांनी हल्लेखोरांवर हल्ला चढवून त्यांना पकडून ठेवले. पोलीस पोहोचल्यावर तिघांना पोलिसांच्या तावडीत त्यांनी दिले. चौथा मात्र निसटला.
हल्लेखोर गुंडच
चार हल्लेखोरांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून चौथा साई कुंडईकर हा तेथून तलवारी वगैरे घेऊन पळून गेला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. संशयित विशाल गोलतकर (३०) आणि सूरज शेट्ये ऊर्फ बाबू हे दोघेही पर्वरीतील काही गुन्ह्यांत अडकलेले आहेत. संशयित लॉरेन्स डायसवर पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कलम १७८/२०१६, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न करणे आणि कटकारस्थान करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.