गोव्यातील अब्दुल मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिसांचा ‘दया अर्ज’ मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 03:44 PM2019-02-01T15:44:40+5:302019-02-01T15:48:49+5:30
1994 साली हे खळबळजनक प्रकरण घडले होते. या प्रकरणात एकूण सात पोलिसांवर सीबीआयने खुनाचा गुन्हा नोंद केला होता.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यातील पहिल्याच गाजलेल्या गुंड अब्दुल गफार खान याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी ठरवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ‘दयेसाठी’ केलेला अर्ज प्रशासनाने मान्य केल्याने निवृत्त पोलीस निरीक्षक सेबेस्टियन कायरो व निवृत्त पोलीस शिपाई सावळो नाईक यांची दोघांचीही दहा वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेतून सुटका झाली आहे.
25 वर्षापूर्वी म्हणजेच 1994 साली मडगाव पोलीस कोठडीत गुंड अब्दूल याला मृत्यू आला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वरील दोन्ही अधिकाऱ्यांना सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवित दहा वर्षाची कैद सुनावली होती. या प्रकरणाचे पडसाद त्यावेळी संपूर्ण गोव्यात उमटले होते आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन अडचणीत आले होते.
मंगळवारी राज्याच्या गृह खात्याने हा अर्ज मंजूर केला. दोन्ही संशयितांनी केलेल्या दया अर्जाला राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडून सहमती मिळाल्यानंतर गृह खात्याने हा निर्णय घेतल्याची माहिती संबंधित सूत्राकडून मिळाली. दोन्ही संशयितांनी आपले वाढलेले वय आणि शारीरिक आजार हे कारण पुढे करुन दयेसाठी अर्ज केला होता.
1994 साली हे खळबळजनक प्रकरण घडले होते. या प्रकरणात एकूण सात पोलिसांवर सीबीआयने खुनाचा गुन्हा नोंद केला होता. 2002 साली दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने यातील पाच पोलिसांना निर्दोष मुक्त करताना कायरो व नाईक या दोघांवरही सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून प्रत्येकी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र 2003 साली मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचीही निर्दोष मुक्तता केली होती. सीबीआयने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये न्या. रंजन गोगोई व न्या. नवीन सिंग या द्विसदस्यीय पिठाने दोन्ही संशयितांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवत प्रत्येकी दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली होती. त्यानंतर या दोन्ही निवृत्त पोलिसांना कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले होते. नंतर मागचे काही महिने प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना पेरोलवर मुक्त करण्यात आले होते. तुरुंग सूत्रांशी संपर्क साधला असता, दोन्ही संशयित अजुनही पेरोलवरच असल्याची त्यांच्याकडून माहिती मिळाली.
पोलीस कोठडीत अब्दुलचा मृत्यू
संपूर्ण राज्यात पडसाद उमटलेले आणि त्यानंतर सुमारे वर्षभर जिल्हा प्रशासनाला अडचणीत आणणारे हे मृत्यू प्रकरण 17 मे 1994 रोजी मडगावच्या पोलीस कोठडीत घडले होते. एका कथित अपहरण प्रकरणात मडगाव पोलिसांनी अब्दुलला सध्या ज्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल सुरु होतो त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल तंदूर येथून त्याला रात्री 12.20 च्या सुमारास अटक करुन आणली होती. त्यावेळी कायरो यांच्याकडे मडगाव पोलीस स्थानकाचा ताबा होता. अटक केलेल्या अब्दुलला पुरुषांच्या लॉकअपमध्ये न ठेवता महिलांसाठी असलेल्या लॉकअपमध्ये डांबण्यात आले होते. पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला जबर मारहाण झाल्याने पहाटे 2.40 च्या सुमारास त्याला मरण आले. यावेळी केलेल्या पोस्टमार्टममध्ये अब्दुलच्या अंगावर 14 जखमा सापडल्या होत्या. सदर जखमा दांडे किंवा पोलीस वापरत असतात तसल्या लाठय़ामुळे केलेल्या मारामुळे झाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करुन प्रशासनावर दबाव आणण्यासाठी सुमारे वर्षभर अब्दुलचा मृतदेह अंत्यसंस्कार न करताच ठेवला होता. शेवटी हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवितानाच दुसऱ्या बाजूने प्रशासनानेच या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्या.गोगोय व न्या. सिंग यांनी अब्दुलचा पोलीस कोठडीत मृत्यू कसा झाला हे मडगाव पोलीस सिद्ध करु शकले नाहीत असे नमूद करत हा सदोष मनुष्यवधाचाच प्रकार असे नमूद करीत दोन्ही निवृत्त पोलिसांना दोषी ठरवले होते.
कोण होता अब्दुल?
1980 व नव्वदच्या दशकात अब्दुल गफार खान याने केवळ मडगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दहशत माजवली होती. मारामाऱ्या, खंडण्या उकळणे, अपहरण करणे, बलात्कार करणे असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर लागू झाले होते. एक उत्कृष्ट फायटर असलेल्या अब्दुलने एकदा त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही हल्ला केला होता. त्यामुळे त्याला हात लावण्यास त्यावेळी पोलीसही घाबरायचे. काही राजकारण्यांचा आशीर्वाद असलेल्या अब्दुलने आपल्या दहशतीचा दबदबा निर्माण केला होता की त्याच्या विरोधात कोणी तक्रारही द्यायला घाबरायचे. शेवटी पोलिसांनी त्याला रासुका लावून अटक केली होती. त्यावेळी तो लोटली येथील एका घरात लपून होता. आपल्याला अटक करण्यासाठी पोलीस आले आहेत याची माहिती मिळाल्यानंतर त्याने पोलिसावर गोळीबारही करण्याचा प्रयत्न केला होता.