संदेश चुकीचा जातोय, योग्य व्यासपीठावर बोला; श्रीपाद नाईक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:27 PM2023-12-07T13:27:24+5:302023-12-07T13:28:09+5:30
काहीजण स्वत:चीच किंमत कमी करताहेत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिकिटासाठी दावा करणाऱ्यांनी योग्य व्यासपीठावर तो करावा. प्रसार माध्यमांकडे बोलल्यावर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल कडक शब्दात दावेदारांना बजावले आहे.
श्रीपाद नाईक म्हणाले की, भाजपात तिकीट देण्याची काय प्रक्रिया आहे हे माहिती असणारेही दावे करू लागले आहेत, याचे आश्चर्य वाटते. प्रसार माध्यमांकडे बोलून कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश पसरवून काही जण स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत.
उत्तर गोव्यात भाजपमध्ये लोकसभेसाठी चार जणांनी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्याचे माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर व दयानंद सोपटे यांनी तर तिकिटावर थेट दावा केला आहे. सोपटे यांनी श्रीपाद यांना वयोपरत्वे विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत' प्रतिनिधीने श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तिकिटावर कोणीही दावा करू शकतो. एकदा नव्हे चार वेळाहा दावा करा. परंतु, तो योग्य व्यासपीठावर करायला हवा. हवे तर प्रदेशाध्यक्षांकडे बोला, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे जा. परंतु, प्रसार माध्यमांकडे बोलून कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश पसरवू नका. तिकीट कोणाला द्यावे हे पक्ष ठरवणार आहे. पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ उमेदवार निश्चित करणार आहे. उमेदवार निवडण्याची प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत सुरू होणार असल्याचेही श्रीपादभाऊ म्हणाले.