मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:48 AM2019-01-18T10:48:23+5:302019-01-18T11:05:59+5:30
गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पणजी : गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यात यापुढे होणाऱ्या विधानसभेच्या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुका हा कळीचा मुद्दा बनला आहे. भाजपा आणि मगो या दोन्ही पक्षांमध्ये या पोटनिवडणुकांच्या विषयावरून मोठा संघर्ष सुरू झाला आहे.
गेल्या 16 ऑक्टोबर रोजी भाजपाने काँग्रेसच्या दोन आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडले व त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. दोन्ही माजी आमदार शिरोडा व मांद्रे या दोन विधानसभा मतदारसंघांमधून भाजपाच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवणार आहेत. माजी मंत्री दिपक ढवळीकर हे मगोपचे अध्यक्ष आहेत. मगोपचे दोन आमदार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. या शिवाय मगोपचे एक आमदार सरकारी महामंडळाचे चेअरमन आहेत. मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने शिरोडा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध मगोप शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांमध्ये लढणार आहे. यापैकी शिरोडामध्ये मगोपचे उमेदवार ढवळीकर यांनी प्रचारही सुरू केला. त्यांनी नुकताच मोठा महिला मेळावाही घेतला. आपण सरकारविरुद्ध नाही, सरकार पडावे असे मला वाटत नाही पण फुटीरांना धडा शिकवायला हवा असा विचार करून आपण रिंगणात उतरत आहे, असे ढवळीकर यांनी जाहीर केले. मगोपच्या या भूमिकेमुळे पर्रीकर सरकारमधील दुसरा एक घटक पक्ष गोवा फॉरवर्डही आश्चर्यचकित झाला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी लोकमतला सांगितले, की भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मगोपच्या नेतृत्वाशी चर्चा करील. पोटनिवडणुकीवेळी मगोपने उमेदवार उभा करू नये अशी विनंती करील. भाजपाचे मगोपशी संबंध ताणले गेलेले नाहीत. दरम्यान, मगोपने दबावाचे राजकारण न करता हिंमत असल्यास सरकारमधून बाहेर जावे, सरकार पडत असेल तर पडो द्या अशी प्रतिक्रिया नुकतीच पर्रीकर मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.