म्हादईप्रश्नी लवादासमोरच निर्णय हवा : मुख्यमंत्री
By admin | Published: August 29, 2015 02:41 AM2015-08-29T02:41:09+5:302015-08-29T02:41:09+5:30
पणजी : म्हादई नदीतील पाण्याबाबत गोवा आणि कर्नाटक दरम्यान असलेला तंटा हा लवादाच्या बाहेर जाऊन सोडविण्याची गरज वाटत नाही;
पणजी : म्हादई नदीतील पाण्याबाबत गोवा आणि कर्नाटक दरम्यान असलेला तंटा हा लवादाच्या बाहेर जाऊन सोडविण्याची गरज वाटत नाही; कारण लवादासमोरील विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. त्यामुळे लवादासमोरच काय तो
निर्णय होऊ द्या, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत म्हादई पाणी प्रश्नावर सामोपचाराने तोडगा काढण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार आहेत, असे विधान भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू व अनंत कुमार यांनी गुरुवारी केले. पार्सेकर यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्वरीत सचिवालयात पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारले. ते म्हणाले की, पंतप्रधानांची ही भूमिका आपल्यापर्यंत तरी अजून आलेली नाही. तथापि, म्हादई पाणी तंटा हा लवादासमोर असल्याने लवादाबाहेर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. लवादासमोर गोव्याची बाजू भक्कम असून तेथेच अगोदर काय तो निर्णय होऊ द्या.
ते म्हणाले, की कर्नाटकचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना जाऊन भेटले, याची आपल्याला कल्पना आहे. आपण पंतप्रधानांना दिल्लीत भेटलो तेव्हा मोदी यांनी आपल्यासमोर चर्चेवेळी म्हादईचा विषय उपस्थित केला नाही. आपणही म्हादई पाणी तंट्याविषयी त्यांच्याशी काहीच बोललेलो नाही.
(खास प्रतिनिधी)