म्हादईप्रेमींचा हल्लाबोल; जलस्रोत खात्यावर मोर्चा काढत मुख्य अभियंत्यांना घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:14 AM2023-03-15T11:14:39+5:302023-03-15T11:14:56+5:30

खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना घेराव घालून जाब विचारला.

mhadei lovers surrounding the chief engineer by marching on the water resources department | म्हादईप्रेमींचा हल्लाबोल; जलस्रोत खात्यावर मोर्चा काढत मुख्य अभियंत्यांना घेराव

म्हादईप्रेमींचा हल्लाबोल; जलस्रोत खात्यावर मोर्चा काढत मुख्य अभियंत्यांना घेराव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पर्वरी: म्हादईचे पाणी नेणारच असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले असताना, गोव्याचे मुख्यमंत्री त्याचा निषेध करण्याऐवजी कर्नाटकात जाऊन कन्नडमध्ये प्रचार करत आहेत. तसेच जलस्रोत खात्याचे अधिकारी म्हादईबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ काल 'सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा' संघटनेने पर्वरीत निदर्शने केली. यावेळी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना घेराव घालून जाब विचारला.

यावेळी संघटनेचे प्रजल साखरदांडे, आमदार क्रूज सिल्व्हा, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, अभिजित प्रभुदेसाई, अलिना साल्ढाना, जॉन नाझरेथ, तारा केरकर, राजन घाटे, जनार्दन भांडारी, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, महेश म्हांबरे यांच्यासह इतर पदाधिकारी व म्हादईप्रेमी उपस्थित होते.
सुरुवातीला जलस्रोत खात्याच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी निदर्शकांना अडवले. मात्र, संतप्त निदर्शकांनी प्रवेशद्वार ढकलून खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्या केबिनकडे कूच केली. यावेळी निदर्शकांनी केबिनमध्ये उपस्थित असलेले मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री कर्नाटक राज्यात निवडणूक प्रचारासाठी जातात आणि म्हादईबद्दल एकही शब्द बोलत नाहीत, याचा निदर्शकांनी निषेध केला.

मुख्य अभियंता बदामी यांनी मॉनिटरिंग रिपोर्ट केरळ येथील एक्स्पर्ट एम. के. प्रसाद यांनी केल्याचे सांगताच निदर्शक भडकले. त्यांनी रिपोर्ट दाखविण्याचा आग्रह धरला असता त्यांनी आपली असमर्थता दर्शवली. दोन तास बदामी यांच्या केबिनमध्ये निदर्शक थांबले होते.

निमंत्रक हृदयनाथ शिरोडकर यांनी सरकारच्या म्हादईबाबत निष्काळजीपणा आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हल्लीच केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटकात जाऊन पक्षाचा प्रचार करतात म्हादईबद्दल एक अक्षरही बोलत नाहीत, याबद्दल निदर्शकांनी नाराजी व्यक्त केली. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी उपअधीक्षक विश्वास कर्पे, निरीक्षक अनंत गावकर आपल्या पोलीस फौज फाट्यासह उपस्थित होते.

'बदामी गो बॅक'चा नारा

यावेळी उपस्थित निदर्शकांनी बदामी यांना विचारले असता त्यांनी केवळ सारवासारवीची उत्तरे दिली. त्यामुळे निदर्शकांनी 'बदामी गो बॅक' अशा घोषणा देऊन त्यांना फैलावर घेतले. जलस्रोत खात्यात दोनवेळा प्रमोद बदामी यांचा कार्यकाळ वाढवून दिला आहे, तो याच कारणासाठी, असा आरोप निदर्शकांनी यावेळी केला.

म्हादईबाबत अधिकारी अंधारात

यावेळी अभिजित प्रभुदेसाई यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी व लोकांसाठी वळवण्यात येणार नसून अदाणी, जिंदाल सारख्या बलाढ्याच्या कारखान्यांना पाणी पुरवण्यासाठी वळवण्यात येणार आहे. बदामी हे न्यायालयीन लढतींबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोप निदर्शकांनी केला असून त्यांनी त्वरित नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निदर्शकांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mhadei lovers surrounding the chief engineer by marching on the water resources department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा