म्हादईप्रश्नी गोव्याच्या आशा पल्लवित
By admin | Published: July 26, 2016 02:40 AM2016-07-26T02:40:25+5:302016-07-26T02:40:59+5:30
डिचोली : म्हादईप्रश्नी सोमवारी कर्नाटकाच्या पाणी वळवण्याच्या मागणीला विरोध करताना आत्माराम नाडकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे
डिचोली : म्हादईप्रश्नी सोमवारी कर्नाटकाच्या पाणी वळवण्याच्या मागणीला विरोध करताना आत्माराम नाडकर्णी यांनी अतिशय प्रभावीपणे गोव्याची बाजू मांडताना कर्नाटकाचे सर्व दावे उद््ध्वस्त करण्याजोगा युक्तिवाद केल्याने कर्नाटकाचे वरिष्ठ वकील व त्यांची टीम अस्वस्थ झाल्याचे जाणवले.
आपल्या अभ्यासपूर्ण युक्तिवादात नाडकर्णी यांनीअतिशय प्रभावीपणे कर्नाटकाचे सर्व दावे खोडून काढल्याने कर्नाटकाच्या कायदेतज्ज्ञांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने जोडयाचिका सादर करण्याचा निर्णय घेताना, ही जोडयाचिका पूर्वी दाखल केलेली असल्याने त्याबाबत लवादाने याची दखल घेतलेली असून गोव्याची बाजू आजच्या घडीला मजबूत असल्याचे दिसून आले.
कर्नाटकाचे वरिष्ठ वकील फली नरिमन व टीमच्या चेहऱ्यावर निराशेची छाया दिसून आली. आत्माराम नाडकर्णी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करण्यापर्यंत भूमिका मांडलेली असतानाच शेवटचा उपाय म्हणून कर्नाटकाने पुन्हा जोडयाचिकेद्वारे नवे मुद्दे सादर केलेले आहेत. नरिमन यांनी पुन्हा नव्याने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. लवादाने याप्रकरणी निवाडा राखून ठेवलेला असून बुधवारी याप्रश्नी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती दिल्लीतून देण्यात आली.
कर्नाटकाने दुष्काळग्रस्त भागासाठी ७ टीएमसी पाण्याची केलेली मागणी कशी खोटी व चुकीची आहे, हे नाडकर्णी यांनी लवादाला पटवून दिले. कर्नाटकाने म्हादई ही अतिरिक्त साठा असल्याचे दाखवलेले नाही. त्यामुळे ते दाखविल्याशिवाय एका ठिकाणाहून दुसरीकडे पाणी नेता येत नाही. पाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास सुर्ला नाला उद््ध्वस्त होणार असून त्याचा पश्चिम घाट व म्हादई अभयारण्याच्या जीवनचक्रावर परिणाम होणार असल्याचे नाडकर्णी यांनी लक्षात आणून दिले.
गोव्याने जून ते सप्टेंबर महिन्यांत कमी पावसामुळे कशाप्रकारे म्हादईचे पात्र गांजेपर्यंत कमी होते ते दाखवून दिलेले आहे. येथून पाणी मोपा प्रकल्पाला पंपिंग होते. पाण्याची खोली ३ मीटरपेक्षा कमी असल्याने पाणी पंपिंग होत नाही हेही लक्षात आणून दिले.
खाण पट्ट्यातील पाणी पंपिंग करून वापरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. गोव्यातील १८ पैकी १६ बंधारे मे २०१६ मध्ये पूर्ण सुकून गेले. कमी पावसामुळे जर ही परिस्थिती गोव्यावर उद््भवत आहे, तर मग ७ टीएमसी पाणी कर्नाटकाला वळवण्यास दिले तर या भागाची काय भीषण अवस्था होईल याचे
वास्तव चित्र नाडकर्णी यांनी लवादासमोर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहे.
पाणी वळवण्यात आले तर गोव्यावर पिण्याच्या पाण्याचे व सिंचनासाठी भीषण परिणाम जाणवणार आहेत. ज्या सिंचन योजना आहेत, त्या गुंडाळाव्या लागतील. तसेच वन्यजीव, जलवाहतूक यावरही परिणाम होणार असल्याचे लक्षात आणून दिले आहे.
कोणत्याही अभयारण्याच्या क्षेत्रात येणारे पाणी अडवता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अभयारण्यातील वन्यजीव व वनस्पतींचे रक्षण होण्यासाठी केंद्राने खास कायदा केलेला असून त्यामुळे कर्नाटकाने म्हादई अभयारण्यातून जाणाऱ्या पाण्याला वळवण्याचा केलेला प्रयत्न हा बेकायदा असल्याचा युक्तिवाद गोव्यातर्फे करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कर्नाटकाने पाणी वळवण्याची केलेली मागणी ही लवादाच्या कक्षेबाहेरील आहे.
या एकूण युक्तिवादामुळे कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकलेली असून २७ रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
(प्रतिनिधी)