म्हादईप्रश्नी तोडग्याची पंतप्रधानांकडून ग्वाही, राज्यपालांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 07:58 PM2019-12-13T19:58:44+5:302019-12-13T19:59:04+5:30
कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली.
पणजी : म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. पंतप्रधानांनी तोडग्याचे आश्वासन राज्यपालांना दिले असा दावा राज्यपालांच्या वतीने सरकारने केला आहे.
राज्यपाल मलिक यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. मलिक हे गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटले. म्हादई नदीचे गोव्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे व गोव्याची ती जीवनदायीनीच आहे असा मुद्दा राज्यपालांनी मांडल्याचे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय वन मंत्रलयाने मंजुरी पत्र दिले हा मुद्दा राज्यपालांनी पंतप्रधानांसमोर मांडला. पंतप्रधानांनी विषय ऐकून घेतला व योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपाल पंतप्रधानांना भेटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फोनवरून राज्यपालांशी चर्चा केली व दोन दिवसांत सकारात्मक तोडगा निघेल, असे राज्यपालांना कळविले.
राज्यपालांनी पंतप्रधानांशी अन्य कोणत्या विषयावर चर्चा केली ते सरकारने स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यापूर्वी दोन वेळा जावडेकर यांच्याशी फोनवरून बोलले पण केंद्राकडून कोणतेच महत्त्वाचे असे नवे पत्र गोव्याला आले नाही. कर्नाटकला दिलेले मंजुरी पत्र रद्द करा किंवा स्थगित ठेवा अशी गोव्याची मागणी आहे. राज्यातील अनेक संस्था व विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी म्हादईप्रश्नी चळवळ चालवली आहे. विरोधी काँग्रेसने येत्या 15 रोजी दिल्लीत जाऊन निदर्शने करण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची अलिकडेच भेट घेतली होती तेव्हा आपण हा विषय पंतप्रधानांर्पयत नेईन, असे राज्यपालांनी नमूद केले होते.