म्हादईप्रश्नी आम्ही कमी पडलो: मायकल लोबो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 09:58 AM2024-08-01T09:58:03+5:302024-08-01T09:59:04+5:30
सोसायटी अध्यक्ष, मंडळावर वॉच ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादईप्रश्नी आम्ही मागे पडलो. त्यामुळेच म्हादईचे पाणी वळविण्याची प्रक्रिया सुरूच आहे. म्हादई कशी वाचणार यावर ठोस चर्चा व्हायला हवी, अन्यथा हा लढा आम्ही हरणार, अशी चिंता आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी व्यक्त केली.
म्हादईवरून गोवा व कर्नाटकमध्ये वाद आहे. मात्र, या वादाचे राजकारण केले जात आहे. निवडणुका जवळ येताच म्हादईबाबत भरघोस आश्वासने दिली जातात. त्यामुळे गोव्यात मात्र गोंधळ उडत आहे. म्हादई वाचविण्यासाठी गोव्यात आंदोलने होतात व या आंदोलनात सरकारवर टीका होते, असेही लोबोंनी सांगितले.
म्हादई वाचवायला पाहिजे, असे आम्ही बोलत असतानाच दुसरीकडे मात्र कर्नाटकने तिथे पाणी वळविण्यास सुरुवातही केली. म्हादई कशी वाचणार यावर ठोस चर्चा व्हायला हवी. असेच सुरू राहिले तर म्हादईचा लढा आम्ही हरण्याची शक्यता आहे. म्हादईचा वाद न्यायप्रविष्ठ असतानाही कर्नाटकने पाणी वळविणे सुरूच ठेवले आहे. गोवा लहान राज्य, केवळ दोन खासदार व कर्नाटक मोठे असून, खासदारांची संख्याही जास्त. कदाचित त्यामुळेच तर आम्हाला बाजूला ठेवले तर जात नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला. म्हादई वाचविली नाही तर नद्या राज्यातील नद्यांमधील पाणी आटेल व मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल. म्हादई वन्यजीव अभयारण्यातही पाणी वळविण्याच्या दृष्टीने बेकायदेशीरपणे बांधकाम केले जात आहे. सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी लोबो यांनी केली.
कर्ज घेण्यावर बंधन हवे
राज्यातील अनेक सहकारी सोसायटी लोकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज देत असल्याने लोक त्यांच्याकडे आपले पैसे एफडी रूपात ठेवतात. मात्र, कालांतरने सोसायटीचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळाचे सदस्य कर्ज घेतात व या सोसायटी नुकसानीत जाऊन बंद होतात. यामुळे लोकांच्या घामा कष्टाचा पैसा बुडत आहे. सरकारने यावर करडी नजर ठेवावी. सोसायटीचे अध्यक्ष, तसेच संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाइकांवर त्याच सोसायटीमधून कर्ज घेण्यावर बंधने घालावीत, अशी मागणीही मायकल लोबो यांनी केली.