कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 09:09 AM2024-03-22T09:09:25+5:302024-03-22T09:11:07+5:30

गोव्याकडून अवमान याचिका दाखल, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ठणकावले

mhadei river issue karnataka woes continue a groove dug in the soil to divert water | कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर

कर्नाटकची अरेरावी सुरूच; पाणी वळविण्यासाठी कणकुंबीत खोदला चर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/डिचोली : कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी नव्याने काम सुरू केल्याने गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर करणार असून 'प्रवाह' प्राधिकरणाला पत्र लिहून संयुक्त पाहणी करण्याची मागणी करील, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ठणकावून सांगितले. 

शिरोडकर म्हणाले की, दर पंधरा ते वीस दिवसांनी आमचे अधिकारी तिथे पाहणी करण्यासाठी जातात. कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी नव्याने काम सुरू केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. गोवा सरकार थेट कर्नाटकवर कारवाई करू शकत नाही. प्रवाह प्राधिकरणाने कारवाई करावी लागेल. कर्नाटकने काम सुरू केल्याने न्यायालयाचा अवमान झालेला आहे. यामुळे गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात करणार आहे. प्रवाह प्राधिकरणाने संयुक्त तपासणी करावी, यासाठी आम्ही आग्रह धरू, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईप्रश्नी सभागृह समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची आजपर्यंत एकच बैठक झालेली आहे, असे आमदार विरेश बोरकर म्हणाले. बोरकर हे या समितीचे सदस्य आहेत. ते म्हणाले की, म्हादई नदी वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. गोव्यातील जीवनदायिनी संपविण्याचा घाट घातला जात आहे.

कर्नाटकने मलप्रभा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी नाल्यावर बांधकाम सुरू केले आहे, अशी माहिती देताना सरदेसाई यांनी तेथे सुरू असलेल्या कामांची व्हिडिओ क्लिप शेअर केली. आहे. सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार विनंती करूनही सरकारने तसे करण्याची तसदी घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

'मोदी की गॅरंटी' का नाही? : आरजी

निवडणूक तोंडावर असताना म्हादईचा विषय विरोधकांनी तापविला आहे. म्हादईबाबत 'मोदी की गॅरंटी' का नाही?, असा सवाल आरजीने केला आहे. गोवा फॉरवर्डनेही या प्रश्नावर सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईचे रक्षणाची 'गॅरंटी' का नाही? असा प्रश्न करुन 'सेव्ह म्हादई' कुठे आहे? असेही त्यांनी विचारले. या चळवळीचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नेते कुठे आहेत? असा प्रश्न केला असून कणकुंबी येथून जर मोर्चा काढला तर काँग्रेस- सोबत सहभागी होण्याची आमची तयारी आहे?, असे त्यांनी म्हटले आहे.

नियमाचे उल्लंघन...

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी सातत्याने बेकायदा मार्गाचा अवलंब केला आहे. कणकुंबी येथे कोणतेही काम करणार नाही, अशी न्यायालयाला हमी देऊनही कर्नाटकने पुन्हा या ठिकाणी चर खोदून पाणी मलप्रभेत वळवण्याचा डाव आखल्याचे समोर आले आहे. काल, पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी कणकुंबीला भेट देऊन कर्नाटकचे कारस्थान समोर आणले. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबतीत आम्ही माहिती घेतली असून, लवादाकडे पत्रव्यवहार केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता लवादाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या कर्नाटकच्या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जलस्त्रोत खात्याला तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. राज्याचे हित जपण्यासाठी सर्व ती कडक भूमिका स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.

हा निवडणूक स्टंट : तानावडे

विरोधक उपस्थित करत असलेला म्हादईचा विषय हा निवडणूक स्टंट असल्याचा दावा करत दरवेळी निवडणुकीआधी विरोधी पक्ष हा विषय उकरुन काढतात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे. तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही.
 

Web Title: mhadei river issue karnataka woes continue a groove dug in the soil to divert water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा