म्हादईप्रश्नी सामाजिक कार्यकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; हस्तक्षेप याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:00 PM2023-02-13T13:00:55+5:302023-02-13T13:01:20+5:30
म्हादई जलतंटा लवादाने म्हादई प्रश्नी जो निवाडा दिला आहे, त्याला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. म्हादईबाबत एक नागरिक म्हणून आमचीही बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी यात त्यांनी केली आहे.
म्हादई जलतंटा लवादाने म्हादई प्रश्नी जो निवाडा दिला आहे, त्याला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गोवा सरकारच्या या आव्हान याचिकेत ताम्हणकर यांनी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
ताम्हणकर म्हणाले, की एका बाजूने म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू देणार नसल्याचे विधान गोवा सरकार करीत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई कर्नाटकला वळवण्यासाठी गोवा सरकारची मंजुरी घेतली होती असे विधान केले आहे. त्यामुळे एकूणच गोवा सरकारच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण होत आहे. त्यामुळे म्हादई प्रश्नी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रखरपणे बाजू मांडावी, एक नागरिक म्हणून न्यायालयाने आमचीसुद्धा बाजू ऐकून घ्यावी.
या विषयी गोवा सरकारच्या भूमिकेवर लक्ष ठेवावे, अशी मागणी या हस्तक्षेप याचिकेत केली आहे. आम्ही म्हादई ही आमच्याकडेच रहावी. कर्नाटककडे म्हादईचे पाणी वळवले जाऊ नये, त्यासाठीच आपण ही हस्तक्षेप याचिका सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"