व्याघ्र क्षेत्राला पाठिंबा द्यावा; पालिका, पंचायतींना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:46 AM2023-08-09T10:46:48+5:302023-08-09T10:48:47+5:30
सदस्यांनी नावेली, तळावली, दवर्ली दिकरपाल, रुमडामळ दवर्ली, आके बायश पंचायतींना तसेच मडगाव पालिकेला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याच्या मागणीला मडगाव नगरपालिका व नावेली मतदारसंघातील पंचायतींनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी 'नोटिफाय टायगर रिझर्व्ह टीमच्या केंद्रीय सदस्यांनी केली. त्यासाठी सदस्यांनी नावेली मतदारसंघातील पंचायतींसह मडगाव पालिकेला भेट दिली. यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह राजन घाटे आणि इतरांनी निवेदनही दिले.
सदस्यांनी नावेली, तळावली, दवर्ली दिकरपाल, रुमडामळ दवर्ली, आके बायश पंचायतींना तसेच मडगाव पालिकेला भेट दिली. नावेली, तळावली तसेच दवर्ली दिकरपाल पंचायत येथे सरपंच, पंचायत मंडळाच्या प्रतिनिधींकडून या मागणीला समर्थन देण्याचे आश्वासन देण्यात आले. आर्के बायश पंचायतीत भाजपप्रणित मंडळ सत्तेवर असून तिथेही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे रुमडामळ पंचायतीसमोर आम्ही आमची मागणी ठेवली, अशी माहिती कुतिन्हो यांनी दिली.
त्यानंतर मडगाव पालिकेत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची भेट घेण्यात आली. व्याघ्र क्षेत्र भावी पिढ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने का आवश्यक आहे. याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनीही संबंधित घटकांना विश्वासात घेऊन यासंदर्भात विचार करू, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कुतिन्हो यांनी दिली.
मडगाव पालिकेतही भाजपप्रणित मंडळ आहे, याची आम्हाला जाणीव आहे; पण हा राजकारणाचा विषय नसून व्याघ्रक्षेत्र अधिसूचित होणे हे म्हादई राखून ठेवण्याच्या आणि गोव्याच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्याकरिता पालिका तसेच पंचायतींनी आपल्या बैठकीमध्ये व ग्रामसभेत तसे ठराव घ्यावेत, असे आवाहन कृतिन्हो यांनी केले.
विषय मंडळासमोर मांडणार : शिरोडकर
यासंदर्भात नगराध्यक्ष शिरोडकर यांना विचारले असता, हा विषय पालिका मंडळासमोर मांडण्यात येईल. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या प्रश्नावर आपला पाठिंबा आहे का ? असे विचारले असता, जे काही गोव्याच्या आणि मडगावच्या हिताचे आहे, त्याला आपलाच नव्हे, सर्वांचाच पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले