म्हादई उगमाची परिक्रमा : जल, जंगल, जनक्रांतीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:38 AM2023-08-23T08:38:15+5:302023-08-23T08:40:16+5:30

सत्तरी तालुक्याला लाभलेले हिरवे वैभव कसे अबाधित राखावे, हे आता सत्तरीवासीयांच्या हाती आहे.

mhadei ugam parikrama and need of water forest and people revolution for goa | म्हादई उगमाची परिक्रमा : जल, जंगल, जनक्रांतीची गरज

म्हादई उगमाची परिक्रमा : जल, जंगल, जनक्रांतीची गरज

googlenewsNext

- गजानन वझे, नगरगाव वाळपई

म्हादईच्या या उगमापर्यंत जाण्याचा बऱ्याच दिवसांपासूनचा मानस होता. पण, योग जुळून येत नव्हता. बऱ्याच जणांना विचारल्यावर विविध माहिती मिळाली आणि एकदाचा योग जुळून आला. म्हादई नदीला डाव्या हाताला ठेवून आम्ही पुढे कृष्णापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. कृष्णापूरला सत्तरीवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पिस्तेश्वराचे दर्शन घेतले. 

कृष्णापूरहून डाव्या हाताला आकऱ्या कुकऱ्याची खाडी सोडून आम्ही पुढे गेलो. रस्ता खाचखळग्यांनी भरलेला, उभा चढचा होता. प्रवास सावकाश होत होता. घनदाट अरण्य, उंचच उंच वृक्ष यांनी वाट आच्छादली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे दर्शन झाले. पण, जंगली श्वापदांचा मागमूसही नव्हता. वाटेत 'फणस' छान लगडलेला होता. प्रवासात भीती होती ती कर्नाटकच्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची. त्यांचा दारा मोठा होता. पण, मजल दर मजल करीत आम्ही तरवळेला पोहोचलो. तिथे वनखात्याचे कर्मचारी पहारा देत होते. त्यांनी विचारपूस करून आम्हाला पुढे जाऊ दिले. तळवडे गेट पार केल्यावर पुढे गणपती काकांचे घर लागले. त्यांनी बरीच माहिती दिली. ते पंढरपूरचे वारकरी होते. कोदाळ वाळपईतील चिदंबर संस्थानचे भक्त होते. आम्ही म्हादई दर्शनाला आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला.

आम्ही देगावकडे प्रयाण केले. तळवडेहून उजव्या बाजुला तीन चार किलोमीटर गेल्यावर देगाव आले बऱ्याच दिवसांपासून देगावची आस लागली होती. ती भागली. मन आनंदित झाले. भर दुपारी आम्ही गोळाची वेस डोंगरावर चढाई सुरू केली. स्थानिक वाटाड्यासोबत कंबरेपर्यंत पोहोचलेले गवत तुडवीत डोंगर माथ्यावरील म्हादईपर्यंत जाऊन पोहोचलो. उगमस्थानी जीवनदायिनीची पूजा करून कर्नाटक सरकारला सुबुद्धी देण्याची मागणी केली. 

म्हादईला तिच्या उगमाजवळच विरुद्ध बाजुला वळवून नेण्याचा कर्नाटकी प्रयत्न फार वर्षांपूर्वी झाला होता. त्याच्या खुणेचे दगड ठिकठिकाणी दृष्टीस पडले. गोळाची वेस डोंगरावर उताराचा फायदा घेऊन कर्नाटकने वरून गावात नळपाणी योजना स्थानिक देगाव गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी करून दिलेली आहे. म्हादईचे उगमस्थान काही मीटरने इकडे तिकडे झाले असते, तर तिचा प्रवाह कर्नाटकच्या दिशेने झाला असता. पण, नियतीने पूर्णपणे गोव्यासाठी तिची निर्मिती करून तिला गोव्याकडे मार्गस्थ केले आहे. 

लहान मोठ्या घरांचे देगाव सुमारे ३० घरकुलांचे आहे. देगाववासीय शांत, प्रेमळ आहेत. बहुतांश तरुण कामानिमित्त गोव्यात वास्तव्य करून आहेत. शेती, बागायती, गोधन हे येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. गवतापासून डहाळ्या बनविण्याचे कसब येथील महिलांना छान अवगत आहे. डहाळ्या विकून त्या संसाराला हातभार लावतात. गोवेकर आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, आदरातिथ्याचे मूळ हे देगाव आहे. याच गावात उगम पावलेली म्हादई ते प्रेम आम्हा गोवेकरांपर्यंत घेऊन येते. देगावमध्ये म्हादईचे अमृतजल पिऊन आम्ही तृप्त झालो. देगाववासीयांचा पाहुणचार स्वीकारून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

गोळाची वेस येथे उगम होऊन पुढे गवाळीहून येणारा नाला सोबत घेऊन पुढे पोहा ओझरवरून जामगावमध्ये तिला भंडुरा नाला मिळतो. बोकेलीचा नाला कमनाळीचा नाला मिळून मॅड्रिल, पानशिरा असे लहान मोठे नाले मिळून पुढे कृष्णापूरला आल्यानंतर ती हळूहळू बालरूप सोडून बाळसे धरू लागते. उस्ते, मोवाचा गुंडा इथे आल्यावर ती विशाल रूप घेते. आषाढात तिचे विराट घनगंभीर रूप पाहून धडकी भरते. 

सह्याद्रीच्या कडेकपारीतून कातळातून वाट काढत ही गोव्याची जीवनदायिनी कर्नाटकातून अतीव गोडी व आपुलकीचा प्रेमभाव आम्हा गोवेकरांसाठी घेऊन येते. उगमापर्यंत जाऊन उगमस्थानी म्हादईची पूजा करण्याची संधी मिळाली. मी कृत कृत्य झालो. नारायण, कृष्णा व शिवाजी यांच्या सहकार्याशिवाय ही यात्रा संपन्न झाली नसती. 

सत्तरी तालुक्याला लाभलेले हिरवे वैभव कसे अबाधित राखावे, हे आता सत्तरीवासीयांच्या हाती आहे. म्हादईच्या जलाशी प्रतारणा न करता म्हादईचे जल व जंगल भावी पिढीसाठी संवर्धित करण्याची जबाबदारी प्रत्येक सत्तरीवासीयाची आहे. यावर्षी पेटलेले वणवे पुन्हा पेटणार नाहीत, याची काळजी घेऊया. नाही तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी जल, जंगल व जनक्रांतीची गरज आहे.

 

Web Title: mhadei ugam parikrama and need of water forest and people revolution for goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा