म्हादईचे पाणी आटले; डिसेंबरच्या मध्यावरच नदीची पातळी खालावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 01:03 PM2023-12-09T13:03:58+5:302023-12-09T13:04:15+5:30
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी अर्ध्यापेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : कुणकुंबी-कर्नाटक येथे कळसा भांडुरा प्रकल्पच्या माध्यमातून कर्नाटक सरकारने म्हादई नदी वळविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम आता म्हादई नदीतील पाणी पातळीवर जाणवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी अर्ध्यापेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे.
सत्तरी तालुक्यातून म्हादई नदी सुमारे तीस किलोमीटरपेक्षा जास्त वाहत आहे. यावर्षी भरपूर पाउस झाला असल्याने नदीला मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती. पण डिसेंबर महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सत्तरीत शेतकरी चिंतेत सापडले आहे. म्हादई नदी राज्यात साट्रे गावात प्रवेश करते. त्या गावातच सध्या पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे आगामी काळात या गावांची स्थिती काय होईल, हे आगामी काळच ठरविणार आहे.
साट्रे गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावात सध्या म्हादई नदीची पाण्याची पातळी झपाट्याने घटली आहे. दरवर्षी मे महिन्यात जशी स्थिती असते, तशी स्थिती आता आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल, असे लोकांचे म्हणणे आहे. म्हादई नदीसाट्रे गावानंतर नानोडा, उस्ते, सोनाळ, सावर्डे, वेळगे, खडकी, बराजण, सार्वशे, भिरोंडा, गुळेली, गांजे व उसगावमार्गे वाहते. या गावातील नदीच्या पाण्याचा स्तर खालावत चालला आहे.
वेळूस, बाराजण नद्यांवरही परिणाम
म्हादई नदीच्या घटलेल्या पाण्याच्या पातळीमुळे सत्तरीतील उपनद्यांवर परिणाम झाला आहे. वेळूस, बाराजणसारख्या उपनद्या आटण्याच्या मार्गावर आहे. बाराजण येथील नदीची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच खालावली आहे. बाराजण येथील नागरिकांनीही नदीच्या घटलेल्या पाण्याच्या पातळीविषयी चिंता व्यक्त केली आहे.