पदयात्रेस आडकाठी; म्हादईचे पाणी तापले, आरजीच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:27 PM2023-02-21T15:27:24+5:302023-02-21T15:28:29+5:30
पदयात्रा काढण्यासाठी परवानगी देत नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही, असे सांगत रिव्होल्यूशनरी गोवन्सचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क नगरगाव, म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवीत असल्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोमवारी ठाणे-सत्तरी येथून निघालेली रिव्होल्यूशनरी गोवन्सची (आरजी) पदयात्रा पोलिसांनी ठाणे येथील मैदानावरच अडवली. म्हाऊस-सत्तरी ग्रामपंचायतीने या पदयात्रेला आक्षेप घेतल्यामुळे पदयात्रा अडविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते व इतर सरकारी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
पदयात्रेस रीतसर परवानगी घेतली नसल्याने आधी रीतसर अर्ज करावा, मग परवानगी देण्याबाबत कायदेशीर बाबी पडताळणी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आरजीचे कार्यकर्ते संतप्त बनले. यामुळे रात्री बराच उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईप्रश्नी १०० किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी केली होती. सुमारे नऊ दिवसांच्या या पदयात्रेत ठाणे ते उसगाव जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
सोमवारी पदयात्रेसाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब व आमदार वीरेश बोरकर यांसह प्रमुख कार्यकर्ते येथे उपस्थिती होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते व संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे यांची या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर व नेते मनोज परब यांना रीतसर परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले.
शांततापूर्ण मार्गाने जात असलेल्या पदयात्रेला न अडवता आम्हाला आजच्या आज परवानगी द्या, अशी मागणी परब, बोरकर व इतरांनी केली. जोपर्यंत आम्हाला पदयात्रा काढण्यासाठी परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असे सांगत रिव्होल्यूशनरी गोवन्सचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. रात्री कोपार्डे येथे पुन्हा यात्रा रोखली गेली व तणाव वाढला.
कोपार्डेत वातावरण तंग
दरम्यान, सुरुवातीला ठाणे येथून पदयात्रेला परवानगी देण्यात आली. वरिष्ठ स्तरावरून न सूचना आल्याने कार्यवाही झाली. मात्र, रात्री कोपार्डेत पुन्हा पदयात्रा अडवली. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कोपार्डेत वातावरण तंग झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"