मिकी पाशेको अजून बेपत्ताच
By admin | Published: April 26, 2015 01:34 AM2015-04-26T01:34:15+5:302015-04-26T01:35:47+5:30
पणजी : अभियंता मारहाण प्रकरणी अटक चुकविण्यासाठी धडपडणारे आमदार मिकी पाशेको हे अजूनही बेपत्ताच आहेत.
पणजी : अभियंता मारहाण प्रकरणी अटक चुकविण्यासाठी धडपडणारे आमदार मिकी पाशेको हे अजूनही बेपत्ताच आहेत. पोलिसांना सुगावा अजूनही लागलेला नाही.
पाशेको हे दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन झाले आहेत, अशी एक अफवा पसरली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही, असे गोवा पोलिसांनी शनिवारी सांगितले. पाशेको यांना अभियंता मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले असून पोलिसांच्या स्वाधीन होणे हाच एक पर्याय तूर्त तरी त्यांच्यासमोर आहे. तथापि, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पाशेको बेपत्ता झाले आहेत. पोलीस दिल्लीलाही जाऊन आले; पण त्यांचा सुगावा लागला नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयास पाशेको यांनी फेरविचार याचिका सादर केली आहे. ही याचिका अजूनही सुनावणीस आलेली नाही. पाशेको हे बेपत्ता झाल्याने त्यांच्याविरुद्ध कोलवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही नोंद केला आहे. एका आमदाराने एवढे दिवस बेपत्ता होण्याची गोव्यातील ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. अभियंता नाटेकर मारहाण प्रकरणी आपण दंड भरण्यास तयार आहोत; पण आपल्याला तुरुंगात पाठविले जाऊ नये, अशी पाशेको यांची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही भूमिका ते वकिलांमार्फत न्यायालयासमोर मांडणार असल्याचे कळते. दरम्यान, पाशेको हे बेपत्ता होण्यामागे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा हात आहे, असे आयरिश रॉड्रिग्ज यांनी म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी व्यक्त केली. संरक्षणमंत्र्यांच्या घरी मिकी लपले आहेत, असे रॉड्रिग्ज यांनी कोणत्या आधारावर म्हटले ते कळत नाही; पण त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
(खास प्रतिनिधी)