माध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 07:16 PM2019-10-23T19:16:30+5:302019-10-23T19:16:50+5:30
विद्यालयांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या महिला स्वयंसाहाय्य गटांची बिले येत्या ४८ तासात न फेडल्यास शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू
पणजी : विद्यालयांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या महिला स्वयंसाहाय्य गटांची बिले येत्या ४८ तासात न फेडल्यास शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा गोवा फॉरवर्डच्या महिला आघाडीने दिला आहे.
पत्रकार परिषदेत महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. अश्मा सय्यद म्हणाल्या की, ‘ ६५ महिला स्वयंसाहाय्य गटांना माध्यान्ह आहाराची बिले सरकारने फेडलेली नाहीत. दिवाळी सण तोंडावर आला आहे. या महिलांनी दागिने गहाण ठेवून स्वयंसाहाय्य गट चालविण्यासाठी बँकांकडून कर्जे घेतलेली आहेत. सरकारने बिले न फेडल्याने त्यांच्याकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. या स्वयंसाहाय्य गटांचे कर्जे वाढतच चालली आहेत. उदरनिर्वाह चालविण्यासाठी या महिला दिवस रात्र काबाडकष्ट करीत असतात. सरकार कर्जे काढते परंतु ते पैसे जातात कुठे? महिला स्वयंसाहाय्य गटांची बिले का फेडली जात नाहीत? आदी सवाल अश्मा यांनी केले.
त्या म्हणाल्या की, ‘ शिक्षण खात्याच्या संचालक आयएएस महिला अधिकारी आहेत. खात्याच्या प्रशासन विभागाच्या संचालकही महिला आहेत. असे असतानाही त्यांना महिलांच्या अडचणी समजू नयेत हे दुर्भाग्य आहे. ४८ तासात जर ही बिले फेडली नाहीत तर शिक्षण अधिकाºयांना आम्ही घेराव घालू.’