राज्याची मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने वाटचाल : मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 01:56 PM2018-10-05T13:56:01+5:302018-10-05T14:07:43+5:30
मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला.
म्हापसा - मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला. गोवेकरांनी उठाव करण्याची गरज व्यक्त केली. तसेच राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने असल्याचे सांगितले. कळंगुट मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले लोबो हे पर्रीकरांचे निकटवर्तीय मानले जातात. साधन सुविधा उपलब्ध करणे म्हणजे विकास नसून लोकांच्या मागण्या पूर्ण करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे याचाही अर्थ विकास असल्याचे लोबो म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर लोबो यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा होती; पण त्यांना डावलण्यात आल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला. ते विदेशात असताना हा फेरबदल करण्यात आला होता. स्थान न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करण्यास लोबो यांनी नकार दिला असला तरी नोकरभरतीवरून मात्र सरकारला टार्गेट केले.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ऑक्टोबर २०१६ साली सरकारी नोकरभरती स्थगित ठेवली. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता होत नसल्याचे लोबो म्हणाले.सध्या सुमारे ३ हजार जागा रिक्त असून मायनिंग व्यवसाय बंद झाल्याने लोकांची अस्वस्थता वाढल्याचे त्यांनी सांगितले. सदर फाईल्स मुख्यमंत्री घेऊन बसले असून बेरोजगारी वाढल्याने युवक व्यसनाधीन होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. युती सरकारातील घटक पक्षांनी सरकारला या मुद्यावर जाब विचारण्याची मागणी केली. तसेच परिस्थिती पाहता राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने असल्याचे लोबो म्हणाले.