उड्डाण करताना ‘मिग २९ के’चा टायर फुटला; सुदैवाने जिवीत हानी टळली
By पंकज शेट्ये | Published: December 26, 2023 05:07 PM2023-12-26T17:07:24+5:302023-12-26T17:08:17+5:30
दाबोळी विमानतळावर नौदलाच्या मिग २९ के या लढावू विमानाचा उड्डाणावेळी टायर फुटला.
पंकज शेट्ये, वास्को : दाबोळी विमानतळावर नौदलाच्या मिग २९ के या लढावू विमानाचा उड्डाणावेळी टायर फुटला. आज दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.
यावेळी लढावू विमान एका बाजूने काहीसे कलंडले. मात्र, नौदलाच्या बचाव पथकाने, अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव मोहिम राबविल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी विमान उड्डाण सुरू होण्याच्या वेळी दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर हा थरार घडला. या घटनेमुळे दाबोळीवर उतरू पाहत असलेली सुमारे अकरा प्रवासी विमाने गोव्यातील नजीकच्या मोपा विमानतळावर आणि देशातील इतर विमानतळावर वळवण्यात आली. टायर फुटून लढावू विमान धावपट्टीवर अडकल्याने क्रेनच्या मदतीने ते बाजूला करण्यात आले. धावपट्टीची पूर्ण तपासणी करून सायंकाळी ४.३० च्या सुमारास विमानतळावरील सेवा पुर्ववत करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढावू विमान कवायतीसाठी उड्डाण घेत होते. मात्र विमानाचा टायर फुटल्याने ते धावपट्टीवरच घसरले व टायरमधून धूर येत एका बाजूने कलंडले. दरम्यान, नौदलाकडून अद्याप या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.