सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी
By समीर नाईक | Published: April 7, 2024 03:26 PM2024-04-07T15:26:28+5:302024-04-07T15:27:15+5:30
सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले होते.
समीर नाईक, पणजी-गोवा: सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले. आणि नंतर शनिवारी सायंकाळी हे मूळ कांपाल येथील परेड मैदानावर स्थलांतरीत करण्यात आले. सध्या या परेड मैदानावर नवीन फुटबॉल मैदानाचे काम सुरू असून, या कामादरम्यान या वटवृक्षाची काळजी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शुक्रवारीपासून सदर वटवृक्ष कापण्यात येत असल्याने सांतीनेझ येथे तणावाचे वातावरण झाले होते. अनेक पर्यावरणप्रेमी आणि गोवा ग्रीन ब्रिगेडचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहत प्रशासनाच्या या कृत्याचे निषेध केला. काहीनी तर येथे नारळ फोडून प्रशासनाविरोधात सार्वजनिक गाऱ्हाणे देखील घातले होते. पण तरीही हे झाड कापून नंतर केवळ वटवृक्षाचे मूळ कांपाल येथे स्थलांतरीत करण्यात आले.
रविवारी सकाळपर्यंत या वटवृक्षाचे मूळ स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया स्मार्ट सिटी प्रशासनाने पणजी महानगरपालिकेच्या सहाय्याने पूर्ण केली. शनिवारी या वटवृक्षाचे मूळ जमनीत घालण्यासाठी आवश्यक मोठा गड्डा देखील खोदण्यात आला होता. नंतर क्रेनच्या सहाय्याने उपळून आणण्यात आलेले हे वटवृक्षाचे मूळ या गड्ड्यात घालण्यात आले.
सध्यातरी हे मूळ कांपाल येथे स्थलांतरित करण्यात आले असले तरी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रात्रीची फुले किंवा पाने तोडण्यास मनाई असताना एवढे मोठे वटवृक्ष कसे तोडण्यात आले?, स्थलांतरीत करण्यासाठी संपूर्ण वटवृक्षाच्या संपूर्ण फांद्या नष्ट करण्यात आल्या आणि केवळ मूळ नेऊन दुसरीकडे लावण्यात आले, त्यामुळे सदर वटवृक्ष यातून जगणार का? स्थलांतरीत केलेला वटवृक्ष या रखरखत्या उन्हात कसे जिवंत राहणार? या वटवृक्षाची काळजी घेण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.