म्हापशात अधिकाऱ्यांशिवाय विक्रेत्यांचे स्थलांतर
By admin | Published: April 18, 2016 02:12 AM2016-04-18T02:12:04+5:302016-04-18T02:12:44+5:30
म्हापसा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला म्हापसा मार्केटमधील स्थलांतरित केलेल्या भाजी विक्रेत्यांचा वाद शमण्याची चिन्हे दिसत
म्हापसा : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला म्हापसा मार्केटमधील स्थलांतरित केलेल्या भाजी विक्रेत्यांचा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी पालिकेतील अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत येथील फळ विक्रेत्यांचे स्थलांतरण केल्याने विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच म्हापसा मार्केटमधील रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची पालिकेची घोषणाही हवेत विरून जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
म्हापसा बाजार आस्थापनासमोरील तसेच साळगावकर फार्मसीपर्यंतच्या रस्त्यावर ज्या जागांवर भाजी विक्रेते बसत होते, त्यांना नवीन मार्केटमध्ये स्थलांतरित करून फळ विक्रेत्यांना नवीन मार्केटसमोरील खुल्या जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली होती. पण तेथील भाजी विक्रेत्यांना हलवून त्यांच्या जागी फळ विक्रेत्यांना आणून आश्चर्यचकित करणारा निर्णयही घेतला आहे. रविवारी केलेल्या स्थलांतरानंतर मार्केटमधील शकुंतला पुतळा परिसरच गर्दीतून मुक्त होणार असल्याचे दिसून आले असून इतरत्र मात्र विक्रेते कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
एका फळ विक्रेत्याला व्यवसाय थाटण्यासाठी ५ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. भाजी विक्रेत्यांना मात्र फक्त तीन चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. रविवारी फळ विक्रेत्यांचे स्थलांतरण करताना शनिवारी व रविवारी विक्री करण्यासाठी मार्केटमध्ये येणाऱ्या महिलांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तेथून हटवण्यात आले. त्यात मसाला विकणाऱ्या महिलांचाही समावेश होता. रविवारी स्थलांतरण केलेल्या फळ विक्रेत्यांना जी जागा दिली आहे, त्या जागेवरूनही असंतोष निर्माण झाला आहे.
२ एप्रिल रोजी भाजी विक्रेत्यांचे नवीन प्रकल्पात स्थलांतरण करण्यात आले. त्या वेळी एकमेव पालिका निरीक्षक वगळता इतर कोणताही वरिष्ठ अधिकारी किंवा मुख्याधिकारी तेथे उपस्थित नव्हते. पालिकेच्या बाजार समितीचे अध्यक्ष फ्रॅन्की कार्व्हालो यांच्या नियंत्रणाखाली हे स्थलांतरण सुरू होते. रविवारी फळ विक्रेत्यांचे स्थलांतरण करताना तेथे फ्रॅन्की कार्व्हालो आणि नगरसेवक मार्टिन कोरास्को उपस्थित होते. पालिकेतील निरीक्षक या वेळी अनुपस्थित होते. या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी म्हापसा पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह काही पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
मार्केटमध्ये एकूण ६४ फळ विक्रेते विविध ठिकाणी बसतात. रविवारी शकुंतला पुतळ्याजवळ बसणाऱ्या ३७ फळ विक्रेत्यांचे नवीन जागेत स्थलांतरण करण्यात आले. रविवारी संध्याकाळपर्यंत काहीजणांनी नवीन जागेत व्यवसाय सुरू केला, तर काहीजणांनी पूर्वीच्याच जागी बसून व्यवसाय करणे पसंत केले. सध्या फळ विक्रेत्यांचे स्थलांतरण केले आहे त्या ठिकाणी बसणाऱ्या प्लास्टिक विक्रेत्यांना मांसविक्री दुकानासमोरील जागेत बसवण्यात येणार आहे.
इतर फळ, मीठ तसेच कपडे विक्रेत्यांना म्हापसा बाजारापासून ते पॅराडाईज फार्मसीपर्यंतच्या रस्त्यावर बसवण्यात येणार आहे. त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती कार्व्हालो यांनी
दिली. सध्याच्या नियोजनामुळे मार्केटमधील एकही रस्ता विक्रेत्यांपासून मुक्त राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅसेट्सची विक्री करणाऱ्यांना मार्केटमध्ये जागा
मिळणार नसल्याचे कार्व्हालो यांनी स्पष्ट केले.
(खास प्रतिनिधी)