मिकी पाशेकोंचा पॅरोलसाठी पुन्हा अर्ज
By admin | Published: July 25, 2015 03:02 AM2015-07-25T03:02:26+5:302015-07-25T03:02:36+5:30
मडगाव : गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात भाग घेता यावा यासाठी पॅरोलवर मुक्तता करावी,
मडगाव : गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात भाग घेता यावा यासाठी पॅरोलवर मुक्तता करावी, अशी मागणी नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी केली आहे. यासंदर्भात तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोमीस यांच्याकडे संपर्क साधला असता, अर्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात मिकी सध्या शिक्षा भोगत आहेत.
नुवे मतदारसंघातील असंख्य प्रश्न विधानसभेत मांडायचे आहेत. त्यासाठी पॅरोल देण्यात यावा, असे या अर्जात म्हटले आहे. गुरुवारी रात्री पाशेको यांनी हा अर्ज सड्यावरील तुरुंगाधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्याची माहिती प्राप्त झाली. या संदर्भात तुरुंग महानिरीक्षक गोमीस यांना विचारले असता शुक्रवारी हा अर्ज मिळाला. मात्र, अजून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही, असे ते म्हणाले. हा अर्ज मंजूर करण्यापूर्वी गोमीस यांना वास्को पोलिसांची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, या अर्जाला अॅड आयरिश रॉड्रिग्स यांनी तीव्र हरकत घेतली आहे. पाशेको यांना कोणत्याही स्थितीत तुरुंगातून बाहेर यायचे आहे त्यामुळे ते अशी वेगवेगळी कारणे शोधतात. कैद्याच्या जवळच्या आप्ताचा मृत्यू किंवा लग्न अशा कारणासाठीच पॅरोल मिळू शकतो. इतर कारणासाठी ही सुविधा मिळू शकत नाही, असा दावा करून विधानसभा अधिवेशनात हजेरी लावणे हा कोणाचाही घटनात्मक किंवा मूलभूत हक्क नाही. त्यामुळे पाशेकोंना ही सवलत देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)