मिकींना कोणत्याही क्षणी तुरुंगाची हवा
By Admin | Published: May 12, 2015 01:55 AM2015-05-12T01:55:42+5:302015-05-12T01:55:58+5:30
पणजी : बचावाचे सर्व पर्याय संपल्यानंतर शरण येण्याआधी सर्वोच्च न्यायालयात जाऊन काही दिलासा मिळतो का, याची चाचपणी करणाऱ्या
पणजी : बचावाचे सर्व पर्याय संपल्यानंतर शरण येण्याआधी सर्वोच्च न्यायालयात जाऊन काही दिलासा मिळतो का, याची चाचपणी करणाऱ्या आमदार मिकी पाशेकोंचा अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. पाशेकोंच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत द्विसदस्यीय खंडपीठाने याचिका रद्दबातल ठरविल्याने पाशेको आणखीच अडचणीत आले आहेत. यामुळे पाशेकोंसमोरील सर्व मार्ग बंद झाले असून शरण येण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होऊन त्यांची रवानगी तुरुंगात होऊ शकते.
न्यायमूर्ती फकीर मोहम्मद कलिफुल्ला व न्यायमूर्ती शिवा कीर्ती सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली. या मागणीला विरोध करणारी आयरिश रॉड्रिग्स यांची हस्तक्षेप याचिकाही न्यायमूर्तींनी सुनावणीस घेतली. आयरिश यांचे वकील देवदत्त कामत यांनी मिकींनी कायद्याची थट्टा आरंभली असल्याचे निदर्शनास आणल्यावर न्यायमूर्तींनीही पाशेको यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी मिकी यांना हायकोर्टाने सहा महिन्यांची कैद फर्मावली आहे. या शिक्षेला आव्हान देणारी पाशेको यांची याचिका याच द्विसदस्यीय पीठाने गेल्या ३0 मार्च रोजी फेटाळली होती. शरण येण्यासाठी मिकी मुदत मागत असले, तरी आपण गेला एक महिना गायब असल्याचे आणि मडगाव प्रथमश्रेणी न्यायालयाने फरारनामा काढल्याचे त्यांनी याचिकेत
मुद्दामहून लपविले आहे, याकडे आयरिश यांनी हस्तक्षेप याचिकेत कोर्टाचे लक्ष
वेधले आहे.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आयरिश यांनी असा आरोप केला की, मिकी यांना सरकारचा आशीर्वाद असल्यानेच गेला महिनाभर लपून बसण्यात त्यांनी यश मिळवले आहे. भविष्यात ते शरण आले, तरी ९ पासून प्रत्येक दिवशी ते कोठे व कोणाच्या सान्निध्यात होते, याची चौकशी व्हायला हवी; कारण त्यांच्या शोधासाठी करदात्यांचा पैसा खर्च झालेला आहे.
दरम्यान, मिकींच्या शोधासाठी दिल्लीत पाठविलेले पोलीस पथक मिकी सापडेपर्यंत तिथेच राहील, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिली.(प्रतिनिधी)