खनिजवाहू ट्रकचा उसगाव येथे बळी
By admin | Published: May 29, 2016 02:01 AM2016-05-29T02:01:08+5:302016-05-29T02:05:47+5:30
फोंडा : उसगावहून आमोणा येथे जाणाऱ्या भरधाव खनिजवाहू ट्रकने स्कूटरचालकाला धडक देऊन चिरडल्याने गांजे-उसगाव
फोंडा : उसगावहून आमोणा येथे जाणाऱ्या भरधाव खनिजवाहू ट्रकने स्कूटरचालकाला धडक देऊन चिरडल्याने गांजे-उसगाव येथील शुभम शशिकांत साखळकर हा १९ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तिस्क-उसगाव येथील कमला थिएटरसमोर शनिवारी सकाळी ९.१५ वाजता ही घटना घडली. ट्रकचालकाने ट्रक तेथेच ठेवून पळ काढला. फोंडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सरकारने खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना वेगमर्यादा घालून दिलेली असली, तरी जास्त खनिजाची ने-आण करण्यासाठी या मार्गावर भरधाव वेगाने ट्रक हाकले जात आहेत. त्यामुळेच हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खनिजवाहू ट्रक (क्र. जीए 0५ टी २५८७) उसगावहून आमोणा येथे जात होता. सिने कमला थिएटरजवळ पोहोचताच ट्रकची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटरला (क्र. जीए 0५ के. ७१३६) बसली व स्कूटरस्वार ट्रकखाली चिरडला गेला. ट्रक वेगात असल्याने घटनास्थळापासून ५-६ मीटर अंतरावर जाऊन थांबला.
जखमी युवकाला जवळच असलेल्या पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुरी व हवालदार विनोद साळुंके यांनी पंचनामा केला. बांबोळीच्या गोमेकॉत उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातानंतर तिस्क-उसगाव ते कोडलीपर्यंतच्या रस्त्यावर खनिज भरलेल्या ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक खनिजमाल नेण्यासाठी भरधाव वेगाने ट्रक हाकले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. शुभम साखळकर
हा काही दिवसांपूर्वीच बारावी उत्तीर्ण
झाला होता व जीव्हीएम-फर्मागुडी येथे प्रथम वर्षाला त्याने प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोक कळा पसरली. (वार्ताहर)