म्हादईच्या सुनावण्यांवर कोट्यवधींचा निष्फळ खर्च
By admin | Published: July 21, 2016 02:22 AM2016-07-21T02:22:26+5:302016-07-21T02:23:45+5:30
पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत
पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी केला.
म्हादईप्रश्नी युक्तिवाद करणारे माजी अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आणि अन्य वकिलांवर सरकारने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या प्रश्नावर २00७ सालापासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या काळात एकूण २८ सुनावण्या झाल्या. या दरम्यान १0 लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर २0१२ ते २0१५ पर्यंत २२ सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांदरम्यान सरकारने २ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च केला. यात नाडकर्णी यांच्यावर ८६ लाख ८९ हजार रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून म्हादईप्रश्नी सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, असा दावा ताम्हणकर यांनी केला.
२0 आॅक्टोबर २0१३ ते २४ आॅक्टोबर २0१३ या पाच दिवसांसाठी पी.एस. नरसिंहा यांच्यावर ६ लाख ६0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच अॅडव्होकेट जनरल यांच्यासमवेत जाणाऱ्या त्यांचे असिस्टंट इत्यादींच्या खर्चाची वेगळी रक्कम नमूद करण्यात आली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना तेव्हाचे अॅडव्होकेट जनरल कंटक यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर विधानसभेत ओरडून सांगत असत. मात्र, आता भाजपच्या काळात लाखोंनी रुपयांची उधळपट्टी चालली असताना पर्रीकर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला आहे.
जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मांद्रेकर यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा किंवा म्हादई प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरलेले मांद्रेकर यांच्याकडून सरकारने राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. (प्रतिनिधी)